नागपूर – लॉकडाऊनच्या काळात स्वस्त धान्याचा काळाबाजार होत असल्याचे प्रकार वाढले असून असाच प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आला आहे. नागपूर जिल्ह्यातील सिल्लेवाडा येथे स्वस्त धान्य दुकानात आलेला हजारो किलो धान्य लाभार्थींना न देता काळाबाजार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने संबंधित दुकानावर छापा टाकला असता रेशन दुकानदाराने गरिबांच्या हक्काचे तब्बल 4 हजार किलो तांदूळ दुसरीकडे साठवल्याचे उघड झाले आहे.
सिल्लेवाडा येथे स्वस्त धान्य दुकानात आलेला हजारो किलो धान्य गरीब कुटुंबाना न वाटताच त्याची रवानगी काळाबाजार करण्यासाठी इतरत्र केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानीय गुन्हे शाखेने संबंधित दुकानावर छापा टाकत कारवाई केली. यावेळी रेशन दुकानदाराने गरिबांच्या हक्काचे तब्ब्ल 4 हजार किलो तांदूळ दुसरीकडे साठवल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी जप्त केलेल्या तांदळाच्या सर्व 81 पोत्यांवर शासनाचे सील लागलेले आहे.
पोलिसांनी स्वस्त धान्य दुकानदार दिलीप कळमकर विरोधात गुन्हा दाखल करत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना चौकशी सोपविली आहे. दरम्यान, एकीकडे लॉकडाऊनमध्ये सरकार आणि प्रशासन गोरगरीब जनता उपाशी राहू नये यासाठी उपाययोजना करत आहे. मात्र, अशा घटनांनी सरकारच्या या प्रयत्नांना हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे.