सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची कोषाध्यक्ष आणि साताऱ्यात भरलेला 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजन समितीचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर एका व्यक्तीने हल्ला चढवला. एवढंच नाही तर संमेलन घेतोच कसे? अशी धमकी देखील दिली. ही घटना संमेलन स्थळावर प्रकाशन कट्टा दालनाच्या परिसरात घडली आहे. याप्रकरणी प्रज्ञा सूर्य सामाजिक संस्थेचा सदस्य संदीप जाधव याला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संमेलनाच्या दालनांमध्येच असा खळबळजनक प्रकार घडल्याने निमंत्रित सारस्वत आणि रसिक श्रोते अवाक झाले. गेल्या दोन दिवसापासून अत्यंत उत्साहामध्ये साहित्य संमेलन सुरू होते. शनिवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी प्रकाशन कट्ट्यावरचा कार्यक्रम आटोपून व्यासपीठावरून खाली येत होते. त्यावेळी प्रज्ञा सूर्य सामाजिक संस्थेचा अध्यक्ष संदीप जाधव (वय-42 रा. तांदुळवाडी ता. कोरेगाव) यांनी तेथे येऊन कुलकर्णी यांच्यावर अचानक हल्ला चढवला. त्याने त्याच्या जवळील काळ्या रंगाची पावडर विनोद कुलकर्णी यांच्या तोंडावर टाकली. तसेच तू संमेलन घेतोच कसे अशी दमदाटीची भाषा वापरत जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान या पावडरमुळे विनोद कुलकर्णी यांच्या डोळ्याला जळजळ होऊ लागली. शाहूपुरी पोलिसांनी तात्काळ जाधव याला ताब्यात घेत त्याची पोलीस स्टेशनला रवानगी केली. जाधव याने संमेलन स्थळावर “जय जवान जय किसान” म्हणत तिथेच राष्ट्रगीत गायला प्रारंभ केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे संमेलन स्थळावरील सर्व निमंत्रित सारस्वत आणि रसिक स्रोते आवाक झाले. या प्रकाराचा सर्व साहित्यप्रेमींनी निषेध केला असून साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील असले प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे. कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी सर्व साहित्यिक महामंडळाचे पदाधिकारी श्रोते यांना शांत राहण्याचे आवाहन केले असून यापुढेही साहित्य सेवा माझी अशी अखंडपणे सुरू राहील अशी ग्वाही दिली आहे.