Black Fungus: म्युकरमायकोसिसमुळे 6 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू, नगर जिल्ह्यातील घटना

नगर – देशात करोना संसर्गाने थैमान घातलं होतं. आता करोना संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. मात्र करोनातून बचावलेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिसचा अर्थात ब्लॅक फंगसचा धोका निर्माण झाला आहे. त्यातच म्युकरमायकोसिसमुळे एका सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
अवघ्या 6 महिन्यांच्या चिमुरडीचा म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला आहे. नगर जिल्ह्यातील लोणी इथल्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात या चिमुरडीवर उपचार सुरू होते. इथल्या डॉक्टरांनी मुलीचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र मुलीचा जीव वाचवण्यात त्यांना यश आले नाही.
मुळची शिर्डी येथील या मुलीला कोपरगांव इथल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथून तिला नाशिकच्या एका रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं. नाशिकमध्ये मुलीची अँटीजेन आणि आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली होती. या दोन्ही टेस्ट निगेटीव्ह आल्या होत्या. लोणी इथे तज्ज्ञ डॉक्टर असल्याने या मुलीला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान चिमुरडीची एमआरआय चाचणी केल्यानंतर म्युकरमायकोसिसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर मुलीला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं. डॉक्टरांना मुलीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र यश आलं नाही. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळेच मुलीला म्युकरमायकोसिसची लागण झाली होती, असं बालरोग विभागाचे प्रमुख राजीव चॅटर्जी यांनी सांगितले.





