इंडियानापोलिस – अमेरिकेत एका कृष्णवर्णीय डॉक्टरचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. मात्र मृत्युपूर्वी या डॉक्टरने वंशभेदाची वागणूक मिळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यामुळे नव्याने असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉक्टर सुसंन मूर या 52 वर्षीय डॉक्टर महिलेला महिन्याभरापूर्वी कारमेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या डॉक्टर महिलेवर करोनाचे उपचार सुरू होते. मात्र आपल्याला वंशभेदाची वागणूक मिळत असल्याचे त्यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या मेसेजमध्ये म्हटले होते.
7 डिसेंबर रोजी डॉ. मूर यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. मात्र 12 तासांनंतर लगेच त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या दरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवावे लागले होते.
दिनांक 20 डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला, असे त्यांच्या मुलाने सांगितले. करोनाचा संसर्ग आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये अधिक आढळतो आहे. लठ्ठपणा, मधुमेह आणि अस्थमा असलेल्या व्यक्तींना हा संसर्ग अधिक लवकर होतो. कृष्णवर्णीयांच्या आरोग्याकडे आरोग्य सेवेतून दुर्लक्ष होत असल्याचा एक प्रवाद आहे. डॉ. मूर यांना फुफुसाशी संबंधित आजार होता.
दरवेळी डॉ. मूर यांना तपासणीसाठी जाताना स्वतःची अधिक काळजी घ्यावी लागत असे असेही त्यांच्या मुलाने सांगितले. डॉ. मूर यांनी स्वतःला वंशभेदाची वागणूक मिळत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे अमेरिकेत प्रक्षोभ निर्माण होतो आहे. काही महिन्यांपूर्वी इंडियानापोलिस इथेच एका कृष्णवर्णीय व्यक्तीला पोलिसांनी गुडघ्याखाली दाबून ठेवल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इंडियानापोलिस इथे मोठ्या दंगली उसळल्या होत्या.