Pune District : भाजयुमोची ‘युवाजागर यात्रा’ लवकरच बारामतीत
Pune District : यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडीक म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्त्याने भारतीय जनता पक्षाची विचारधारा प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवावी.

बारामती : भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडीक यांच्या उपस्थितीत बारामती येथील कृष्णसागर हॉटेल येथे भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक उत्साहात पार पडली. यावेळी लवकरच भाजप युवा मोर्चाची राज्यव्यापी ‘युवाजागर यात्रा’ बारामतीत दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली.
बैठकीत संघटन विस्तार, युवकांचा वाढता सहभाग, बूथ सक्षमीकरण, सामाजिक उपक्रम, जनसंपर्क अभियान तसेच आगामी काळात तालुका व शहर स्तरावर युवा मोर्चाचे मेळावे आयोजित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडीक म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्त्याने भारतीय जनता पक्षाची विचारधारा प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवावी.
समाजहिताची भूमिका अधिक सक्षमपणे पार पाडत युवकांना संघटनेशी जोडण्यासाठी सातत्याने काम करावे. आगामी काळात युवा मोर्चाचे मेळावे, जनजागृती उपक्रम आणि संघटनात्मक कार्यक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात यावेत, असे आवाहन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की, युवा मोर्चा हा केवळ राजकीय संघटनात्मक घटक नसून समाजातील सकारात्मक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. युवकांच्या सहभागातून भारतीय जनता पक्षाची विचारधारा अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय भूमिका बजावणे आवश्यक आहे.
प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांच्या सूचना जाणून घेत त्यांना आवश्यक मार्गदर्शन केले. या दौऱ्यामुळे बारामती तालुक्यातील भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात अधिक जोमाने संघटन वाढीसाठी आणि जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडीक, जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर, जिल्हा सरचिटणीस स्वप्नील मोडक, ओमकार कडे, विवेक साळुंके, बारामती शहराध्यक्ष अभिषेक चिंचकर, तालुकाध्यक्ष जगदीश कोळेकर, संदीप केसकर, मयूर शिंदे, ऋग्वेद सातपुते, हर्षद जगदाळे, सोहेल शेख, शुभम सूर्यवंशी, रोहित शिंदे, साई पवार तसेच भाजप युवा मोर्चाचे जिल्हा, तालुका व शहर पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडीक यांच्या मार्गदर्शनामुळे बारामतीतील भाजप युवा मोर्चाच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा आणि नवसंजीवनी मिळाल्याची भावना व्यक्त केली.
गावागावात भाजयुमोची शाखा
आगामी काळात आम्ही युवा मोर्चाच्या शाखा ताकतीने स्थापन करू.गावागावात युवा मोर्चाची शाखा करणे.अधिक कार्यकर्ते जोडणे हे उद्दिष्ट ठेवून युवा मोर्चाचे कार्यकर्ते काम करत आहेत.असे जिल्हा अध्यक्ष वैभव सोलनकर यांनी सांगितले. बैठकीत कार्यकर्त्यांनी विविध संघटनात्मक विषयांवर मते मांडली. आगामी कार्यक्रमांचे नियोजन, युवकांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचविण्याचे नियोजन तसेच ‘युवाजागर यात्रा’च्या यशस्वी आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली.





