पुणे : महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भारतीय जैन संघटना (बीजेएस) पुढाकार घेत आहे. संस्थापक शांतिलाल मुथ्था यांच्या नेतृत्वाखाली २४ सप्टेंबर रोजी झालेल्या ऑनलाइन बैठकीत पूरग्रस्त भागातील मदतकार्यासाठी ठोस ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला, राज्याध्यक्ष केतन शहा, राज्यसचिव प्रवीण पारख आणि कोमल जैन यांनी मार्गदर्शन केले. पूरग्रस्त जिल्ह्यांतील तालुका व जिल्हा पातळीवरील कार्यकर्त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य विशद केले. प्राथमिक उपाययोजना: १. पूरग्रस्त भागातील विस्थापितांना जेवण आणि खाद्य पुरवठा. २. जैन समाजातील आणि इतर डॉक्टरांशी संपर्क साधून वैद्यकीय सेवा उपलब्ध करणे. ३. जिल्हा आणि तालुका पातळीवर कार्यकर्त्यांची फळी तयार करून कार्याचा ॲक्शन प्लॅन तयार करणे. ४. मंदिरे आणि स्थानकांशी संपर्क साधून जनावरांसाठी चारा पुरवठ्याचे नियोजन. ५. स्थानिक स्वयंसेवी संस्थांसह संकटकाळात सहकार्याची परवानगी कार्यकर्त्यांना देणे. शैक्षणिक पुनर्वसन आणि सामाजिक उपाय: पूर आणि आत्महत्यांमुळे प्रभावित शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी बीजेएसने स्वीकारली आहे. इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन वाघोली येथे करण्याचे नियोजन आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहेत. पूरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, अनेकजण कर्जबाजारी झाले आहेत. यामुळे सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. यावर उपाय म्हणून डिसेंबर-जानेवारी महिन्यात पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळेल आणि आत्महत्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. यासाठी साखर कारखाने आणि स्थानिक संस्थांचे सहकार्य घेतले जाणार आहे. प्रोजेक्ट डायरेक्टरची नियुक्ती: या संपूर्ण मदतकार्याचे समन्वयक म्हणून बीजेएसचे महाराष्ट्र राज्यसचिव प्रवीण पारख (संपर्क: 9422565911) यांची प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला आणि राज्याध्यक्ष केतन शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य राबवले जाईल. महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी बीजेएसने घेतलेल्या या पुढाकारामुळे समाजात आशेचा किरण निर्माण झाला आहे.