भाजपच्या विजयाची ‘रिटर्न गिफ्ट’ मिळालं; पीएफवरील व्याजदर कपातीवरून काँग्रेसची टीका

नवी दिल्ली – भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याच्या प्रस्तावावरून विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ती कपात म्हणजे विधानसभा निवडणुकांतील भाजपच्या विजयाबद्दल जनतेला देण्यात आलेली रिटर्न गिफ्ट आहे, असे कॉंग्रेसने म्हटले.
देशातील 84 टक्के जनतेचे उत्पन्न आधीच घटले आहे. अशावेळी कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या बचतीवर आक्रमण करणे योग्य आहे का, असा सवाल कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी ट्विटरवरून उपस्थित केला.
माकप आणि भाकपनेही सरकारवर टीकेची झोड उठवली. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सरकारने कर्मचाऱ्यांवर आणखी एक हल्ला केला आहे, अशी प्रतिक्रिया माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी दिली.
निवडणुकांतील विजयानंतर भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पुन्हा खरे रंग दाखवले आहेत. व्याजदर कपातीच्या प्रस्तावाचा फेरविचार करावा, अशी मागणी भाकपकडून करण्यात आली. पीएफवरील व्याजदर कमी करण्याची नव्हे; तर वाढवण्याची गरज आहे, अशी भूमिकाही भाकपने मांडली.



