भाजपकडून माझ्या जीवाला धोका – केजरीवाल

इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच हत्या होण्याची व्यक्त केली भीती

नवी दिल्ली  -भाजपकडून माझ्या जीवाला धोका आहे. एक दिवस माझी हत्या केली जाईल, असा सनसनाटी आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी केला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच माझीही सुरक्षारक्षकाकरवी हत्या केली जाऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

पंजाबमध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना केजरीवाल यांनी खळबळजनक आरोप केला. माझे सुरक्षाअधिकारी भाजपला रिपोर्टींग करतात, असा दावाही त्यांनी केला. काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील रोड शोवेळी एका व्यक्तीने केजरीवाल यांना चपराक मारली. त्या घटनेचा ठपका आपने भाजपवर ठेवला. तर, ते कृत्य करणारी व्यक्ती आपचा नाराज कार्यकर्ता असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले. त्याचा संदर्भ देऊन केजरीवाल म्हणाले, माझी हत्या होईल आणि ते कृत्य आपच्या नाराज कार्यकर्त्याने केल्याचे पोलीस म्हणतील. कॉंग्रेसचा एखादा कार्यकर्ता पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावर नाराज असेल; तर तो त्यांना मारेल का? भाजपचा कार्यकर्ता नाराज असेल; तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत तशी कृती करेल का, अशी विचारणाही त्यांनी केली.

दरम्यान, केजरीवाल यांच्या आरोपावर दिल्ली पोलिसांकडून प्रतिक्रिया देण्यात आली. सगळ्याच राजकीय पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांना सुरक्षा पुरवली जाते. ते सुरक्षारक्षक उच्चकोटीच्या निष्ठेने त्यांचे कर्तव्य निभावतात. केजरीवाल यांचे सुरक्षा पथकही कर्तव्याप्रती वचनबद्ध आहे, असे दिल्ली पोलिसांनी म्हटले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.