हरियाणात भाजपचा तिसऱ्यांदा विजय, राहुल गांधींचे ते वक्तव्य अन् जिलेबी..! वाचा काय आहे प्रकरण…

Rahul gandhi । भाजपने हरियाणा निवडणुकीत तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. या विजयानंतर राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचार सभेत केलेल्या एका वक्तव्याची खिल्ली उडवण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी हरियाणा येथे बोलताना ‘जिलेबी’बाबत वक्तव्य करून भाजपवर निशाना साधला होता. विजयानंतर भाजपने त्यांना जिलेबी पाठवत टीकेचं धनी केलं आहे. मंगळवारी संध्याकाळी भाजपने दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधींच्या नावावर १ किलो जिलेबी देखील पाठवली होती. नेमकं जाणून घेऊयात हा जिलेबी वाद आहे तरी काय?
Rahul gandhi । ‘जिलेबी’ विवाद काय आहे?
राहुल गांधी यांनी हरियाणातील गोहाना येथे ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या प्रचार सभेत एक विधान केले. त्यांनी प्रसिद्ध माटू राम हलवाई यांच्या दुकानातून जिलेबी खाल्ल्याचा उल्लेख करत, ही जिलेबी देशभर प्रसिद्ध व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. असे छोटे व्यवसायिक आपल्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवू शकतात, आणि त्यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होऊ शकतील. या विधानातून राहुल गांधींनी लघु उद्योगांना चालना देण्याची आपली भूमिका स्पष्ट केली आणि मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली.
गांधी म्हणाले होते, “ही जिलेबी संपूर्ण भारतभर उपलब्ध असायला हवी आणि नंतर ती जगभर – अमेरिकेत, जपानमध्ये – निर्यात केली जावी. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार वाढेल.” त्यांनी असेही सांगितले की, जर माटू राम हलवाई यांची जिलेबी जगभर पोहोचली, तर आज त्यांच्या दुकानात १०० लोक काम करतात, पण उद्या १०,००० लोकांना रोजगार मिळू शकेल.
गांधींनी यावेळी केंद्र सरकारच्या नोटाबंदी आणि जीएसटी सारख्या धोरणांवर टीका केली आणि म्हटले की, “मोदीजींनी लघु उद्योगांना ‘चक्रव्यूहात’ अडकवलंय – आधी नोटाबंदी, नंतर जीएसटी, आणि मग बँकांमधली सर्व रक्कम काही मोजक्या अब्जाधीशांना दिली गेली.” सामान्य व्यावसायिकांना बँकांकडून कर्ज मिळणे अवघड झाले आहे, आणि बँका केवळ अदानी आणि अंबानी सारख्या मोठ्या उद्योगांना कर्ज देत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
Rahul gandhi । भाजपची प्रतिक्रिया
राहुल गांधींच्या या विधानाला निवडणूक निकाल लागल्यानंतर उत्तर देताना भाजपच्या हरियाणा युनिटने त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून ट्विट करत, “हरियाणातील सर्व भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने राहुल गांधींना जिलेबी पाठवण्यात आली आहे.” अशी माहिती दिली.
विशेष म्हणजे, हरियाणाच्या तिसऱ्या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी भाजप नेत्यांनी एकमेकांना जिलेबी भरवतच आनंदोस्तव साजरा केला. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद राहुल गांधींच्या विधानावर बोलताना म्हणाले, “राहुल गांधी गोहाना येथून अमेरिका पर्यंत जिलेबीचा कारखाना सुरू करण्याबद्दल बोलत आहेत, पण त्यांना हे माहित असायला हवे की, जिलेबी कशी बनवली जाते.”
भाजपचे इतर नेते देखील जिलेबी वक्तव्यावरून राहुल गांधींवर निशाणा साधत आहेत. उत्तर प्रदेशातील औद्योगिक विकास मंत्री नंद गोपाल गुप्ता यांनी एक ट्विट करत म्हटले की, “हरियाणातील जनतेने काँग्रेसच्या खोट्या आश्वासनांवर टाळे ठोकले आहे.” गुप्ता यांनी पुढे म्हटले की, “राहुल गांधींना आज जिलेबीदेखील कडू लागत असेल, कारण हरियाणातील जनतेने भाजपला विजयी करून तोंड गोड केले आहे”





