सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मायक्रो प्लॅनिंगचे वेगळे राजकारण पाहायला मिळूलागले आहे. सूत्रबद्ध पद्धतीने पक्षादेश राबवून भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी जिल्ह्यामध्ये नगरपालिकेसह आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांतील यश मिळवण्यासाठी ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून पावले टाकली आहेत. त्यातून जिल्ह्यात भाजप हाच थोरला भाऊ असल्याचा संदेश महायुतीच्या घटक पक्षांना दिला आहे. मनोमिलनात भाजपचा अंकुश साताऱ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आघाड्यांमध्ये स्पर्धा असताना भाजपने अंकुश ठेवत उमेदवार यादी दिली. त्यातही निर्णायक क्षणी शिवेंद्रसिंहराजे यांचे मुरब्बी राजकारण वरचढ ठरले आणि त्यांचे समर्थक अमोल मोहिते यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडली. महाविकास आघाडीने येथे प्रचंड कसरत केली. तिन्ही घटक पक्षांनी मिळून ४५ उमेदवार दिले असून एकतर्फी वाटणाऱ्या सातारा शहरातील राजकारणापुढे आव्हान निर्माण केले आहे. कराडमध्ये भाजपची आक्रमक रणनीती कराड पालिका स्वबळावर लढण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक प्रयत्न केले. जनशक्ती आघाडीच्या माजी नगराध्यक्षा शारदा जाधव गटाला सोबत घेत मजबूत मूठ बांधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. केंद्र लेव्हल ते बूथ लेव्हल यादरम्यान भाजपची वातावरण निर्मिती करण्यात अतुल भोसले यांना यश आले आहे. माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या लोकशाही आघाडीने यशवंत विकास आघाडीची हातमिळवणी केली आहे. काँग्रेसच्या एका गटाने स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे कराडात तिरंगी लढत पाहायला मिळेल. नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून विनायक पावसकर, आघाडीकडून राजेंद्रसिंह यादव आणि काँग्रेसकडून झाकीर पठाण यांची उमेदवारी आहे. मलकापूरमध्ये भाजपचे आव्हान मलकापूर नगरपंचायतीमध्ये भाजपने आपल्या राजकीय बांधणीची चुणूक जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांच्या माध्यमातून दाखवली. पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक मनोहर शिंदे यांनाच भाजपच्या गोटात घेऊन सर्व समीकरणे फिरवण्यात आली. मलकापूरमध्ये आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा उरलेला गट अशी लढत होणार आहे. भाजपने तेजस सोनवणे तर राष्ट्रवादी काँग्रेसने आर्यन कांबळे यांना नगराध्यक्षपदासाठी संधी दिली आहे. भाजपने यावेळी चांगलेच आव्हान दिल्यामुळे मलकापूर नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जंग जंग पछाडावे लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. फलटणला प्रथमच पक्षीय लढत फलटण पालिकेची निवडणूक पहिल्यांदाच आघाडीकडून पक्षीय पातळीवर गेली आहे. आजपर्यंत रामराजे गट विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गटात सडत व्हायची. रणजितसिंह नाईक निंबाळकर गट भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) युतीतून निवडणुकीला सामोरा जात आहे. त्यामुळे रामराजे गटाने यावेळी शिवसेनेच्या (शिंदे) चिन्हावर निवडणूक लढवण्याचा धक्कादायक निर्णय घेत राजकारणाला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला आहे. रामराजे यांचे चिरंजीव अनिकेत राजे शिवसेनेकडून तर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसकडून रणजितसिंह यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. रामराजे गटासाठीही आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. त्याशिवाय महाविकास आघाडीच्यावतीने काँग्रेसचे सचिन सूर्यवंशी बेडके यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. म्हसवडमध्ये तिरंगी लढत मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हसवड पालिकेत आपली राजकीय रणनीती पुन्हा एकदा राबवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रभाकर देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट व राष्ट्रीय समाज पक्ष यांनी एकत्र येऊन स्वतंत्र पॅनेल टाकत भाजपला आव्हान उभे केले आहे. शेखर गोरे यांनी सुध्दा तडजोड करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नगराध्यक्षपद व आठ नगरसेवकांच्या जागेवर उमेदवार उभे केले आहेत. नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून पूजा वीरकर, महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे भुवनेश्वरी राजेमाने तर शेखर गोरे यांनी गौरी माने यांना उमेदवारी दिली आहे. या तिरंगी लढतीत वर्चस्व मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. महाबळेश्वरमध्ये भाजपचे लक्ष महाबळेश्वर पालिकेत शिवसेना शिंदे गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे राजकीय प्राबल्य असल्याने गिरीस्थान नगरपालिकेमध्ये भाजपने चार जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. स्थानिक आघाड्यांची समीकरणे म्हणून भाजपने येथे फारशी ताकद लावली नाही. जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे येथील हालचालींवर बारकाईने लक्ष आहे. या पालिकेत ठाकरे गट, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या तिहेरी लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील शिंदे, शिवसेनेने कुमार शिंदे यांना संधी दिली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून डी. एम. बावळेकर व राजेश कुंभारदरे यांनी अर्ज भरले आहेत. पाचगणीत राष्ट्रवादीपुढे आव्हान पाचगणी नगरपालिकेत विजयी अपक्षांना एकत्रित करुन पालिकेत आघाडी अशा समीकरण असते. येथील लक्ष्मी कराडकर यांना बरोबर घेऊन भाजपने शिवसेनेस सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आव्हान देण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे. भाजपने चार जागांवर तर बारा जागांवर कराडकर गटांने उमेदवारी अर्ज भरले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी कराडकर गटाचा अजेंडा अद्याप गुलदस्त्यात आहे. विरोधी गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबतही अद्याप सस्पेन्स कायम आहे. कराडकर यांचे समर्थन मिळवण्यासाठी भाजपने जोरदार रणनीती आखली आहे. मकरंद आबांना बालेकिल्ल्यात आव्हान मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या अजित पवार गटाला भाजपने माजी आमदार मदन भोसले यांनी जोरदार आव्हान दिले आहे. भाजपने राष्ट्रवादीतून आयात केलेले नगराध्यक्ष अनिल सावंत यांना नगराध्यक्षपदासाठी संधी दिली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. नितीन कदम या नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून तेजपाल वाघ तर शिवसेनेकडून योगेश फाळके यांचे उमेदवारी अर्ज नगराध्यक्षपदासाठी दाखल झाला आहे. भाजपचा झेंडा वाई पालिकेवर फडकवण्याच्या दृष्टीने जोरदार रणनीती आखण्यात आली आहे सुनील माने यांच्या साम्राज्याला आव्हान रहिमतपूर मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश केला. येथे लढत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी होणार होती. मात्र, अर्ज भरण्याच्या दिवशी राष्ट्रवादीला शिवसेनेचे वासुदेव माने यांनी पाठिंबा दिला त्यामुळे येथील लढत राष्ट्रवादी व शिवसेना विरुद्ध भाजप अशी होणार आहे. राष्ट्रवादीकडून सुनील माने यांच्या पत्नी नंदना माने यांना तर भाजपने निलेश माने यांच्या पत्नी वैशाली माने यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी दुरंगी लढत होणार आहे. भाजपमध्ये चित्रलेखा माने कदम व निलेश माने असे दोन गट आहेत. त्यांच्यात नगराध्यक्षपदाबाबत एकमत झाले असले तरी दोन नगरसेवक पदावर एकमत झाले नसल्याने दोन्ही गटांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मेढ्यात शिवसेना व शरद पवार गटाचे आव्हान मेढा नगरपंचायतीसाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी भाजपचे उमेदवार स्वतंत्रपणे उभे केले आहे. त्यांच्याविरोधात शिवसेना व शरद पवार गटाचे एकत्रित आव्हान आहे. भाजपच्या रुपाली वारागडे यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून संधी दिली आहे तर शिवसेनेच्यावतीने रेश्मा करंजेकर व शरद पवार गटाच्या सुनीता पार्टे यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरले आहेत. त्यामुळे कोण्या एका उमेदवाराचा अर्ज माघारी घेतला जाण्याची शक्यता आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी येथे कुठेही बंडखोरीचा दगाफटका होणार नाही याची काळजी घेत उमेदवारांना अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. भाजपचे सक्रिय संघटन येथे काम करत असल्याने शिवसेना व शरद पवार गटाला जोरदार परिश्रम करावे लागतील.