सिंहगडरस्ता, दि.25 (जयंत जाधव) – राजकीय साठमारीत पुणे महापालिका निवडणुका लांबवल्या गेल्या आहेत. तर, दुसऱ्या बाजूला भाजपने मात्र बारामती लोकसभा आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी जोरदार मोर्चेबांधणी चालवली आहे. अर्थात या निवडणुकांना अवधी असला, तरी नेत्यांनी मात्र संघटना बांधणीवर जोर दिला आहे.
भाजप नेत्या तथा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या भागांत संघटनात्मक बांधणीसाठी हा मतदारसंघच पिंजून काढला आहे. या एकाच दौऱ्यात लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणुकांच्या दृष्टीने “टार्गेट’ ठेवण्यात आले आहे. गेल्या निवडणुकीत खडकवासला मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराला चांगली मते मिळाली होती. शिवाय, येथील आमदारही भाजपचेच आहेत. त्यामुळे येथून मताधिक्य कायम ठेवण्यासाठी जोरदार ताकद लावली जात आहे. सिंहगड रस्ता भागात भाजपचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. आता सर्वांत जास्त इच्छुक महापालिकेच्या निवडणुकीसाठी याच पक्षाचे आहेत. आपला मतदार संघ राखण्यासाठी नुकतेच नगरसेवक राहिलेल्यांची अटीतटीची लढाई सुरू आहे. तिकीट वाटपात संधी मिळावी, यासाठी वेगवेगळे कार्यक्रम ते घेत आहेत. सध्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये इच्छुक आणि विद्यमान असे चित्र दिसत आहे. पक्षाचे आमदार, खासदार, पालकमंत्री आणि एक मोठा नेता या सर्वांभोवती इच्छुक उमेदवार आपापल्या परीने महापालिकेच्या तिकिटासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, “तुम्ही तुमचे काम सुरू ठेवा योग्य वेळी पक्षाकडून विचार होईल’ असा “मेसेज’ सर्व इच्छुकांना दिला जात आहे.
“दोघा विद्यमानांचा पत्ता कट होणार’;पालिकेसाठी कोणाला संधी मिळणार?
विश्वसनीय सूत्रांनी सांगितल्यानुसार, “या भागात विद्यमान नगरसेवकांपैकी दोघांचा पत्ता कट होणार आहे.’ त्यामुळे सध्या विद्यमान आणि इच्छुक यांच्यामध्ये चढाओढीचे चित्र सिंहगड रस्ता भागात आहे. अशा वेळी तिकीट वाटपानंतर नाराजांची समजूत कशी काढायची? संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी काय उपाय योजना करायच्या? असे प्रश्न नेत्यांपुढे आहेत. पक्षातील वजनदार नेते, खासदार, आमदार, पालकमंत्री यांच्या गटांमधील काही इच्छुक उमेदवार विद्यमान उमेदवार यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्ष भाजप जरी असला तरी तिकीट वाटपासाठी पक्ष नेतृत्वाचा कस लागणार हे नक्कीच आहे.