साताऱ्यात भाजपचेच कमळ फुलेल

कराड – सातारा लोकसभा मतदारसंघ हा भाजपचाच असून येथील उमेदवार कमळ चिन्हावरच निवडणूक लढवून जिंकून येईल. त्यामुळे साताऱ्यात भाजपचेच कमळ फुलेल, असा ठाम विश्वास भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी व्यक्त केला.
येथे शासकीय विश्रामगृहात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज सातारा व कराड दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष एकनाथ बागडी, कराड दक्षिणचे तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, महेश जाधव, माजी नगरसेवक सुहास जगताप, अजय पावसकर, मुकुंद चरेगावकर, रुपेश मुळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. कदम म्हणाले, आजच्या घडीला सातारा लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय भाजपाची ताकद वाढली आहे. त्यात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गटही भाजपसोबत असल्याने लोकसभा निवडणुकीत भाजपाला त्यांच्या गटही नक्कीच मदत करेल.
त्यामुळे याठिकाणी निश्चितच भाजपची ताकद वाढली आहे. तसेच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजप एकत्रित काम करत असून दक्षिणेत डॉ. अतुल भोसले यांचा मोठा गट आहे. पाटणमध्ये मित्रपक्षाचा आमदार असून साताऱ्यात दोन्हीही राजे भाजपकडे आहेत. कोरेगावमध्येही मित्रपक्षाचा आमदार असून वाईत मदनदादा भोसले भाजपचेच आहेत. तर आ. मकरंदआबा पाटील हे अजित पवार गटाकडे असून येथेही भाजपची मोठी ताकद आहे. या सर्व बाबींचा विचार करून सातारा लोकसभेची निवडणूक भाजप कमळ चिन्हावरच लढवून यश मिळवेल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कराड दौऱ्याबाबत सांगताना जिल्हाध्यक्ष कदम म्हणाले, वाई व सातारा येथील दौरा आटपून चंद्रशेखर बावनकुळे दुपारी कराडला येतील. येथील वेणूताई चव्हाण सभागृहात दुपारी 4 वाजता भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीस ते संबोधित करतील. त्यानंतर आझाद चौक ते चावडी चौक दरम्यान पाई चालत जात नागरिक व व्यापाऱ्यांशी ते थेट चर्चा करणार असून सायंकाळी 6 वाजता चावडी चौकात त्यांची जाहीर सभा होणार आहे, या सभेस कराड शहर, दक्षिण व उत्तरसह पाटण मतदारसंघातील पदाधिकाऱ्यारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.





