राहुल गोखले सरकारवर हल्लाबोल करताना सरकारच्या कामगिरीवर समग्रपणे भाष्य करणे गरजेचे आहे. वस्तुतः खुद्द फडणवीस यांची ख्याती एक अभ्यासू वक्ते अशी आहे. असे असताना केवळ शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा एककलमी कार्यक्रम जसा हास्यासपद ठरतो तद्वत हिंमत असेल तर पुन्हा विधानसभा निवडणुका घेऊन दाखवा ही मागणी देखील दर्पोक्ती ठरते. महाविकास आघाडी सरकारला काही दिवसांत शंभर दिवस पूर्ण होतील. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजपने हे सरकार टिकणार नाही, असे भाकित करण्यास सुरुवात केली होती. उद्धव ठाकरे यांना प्रशासनिक अनुभव नसल्याने मुख्यमंत्री म्हणून ते कार्यक्षमतेने काम करू शकणार नाहीत आणि या सरकारचा रिमोट कंट्रोल शरद पवार यांच्या हातीच राहील अशी टीकाही भाजपने केली होती. अर्थात त्यापूर्वी काही दिवसच आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अजित पवार यांच्याशी हातमिळवणी सत्तेसाठीच केली होती याचे भाजप नेत्यांना सोयीस्कर विस्मरण झाले. मात्र काही तासांतच फडणवीस सरकार कोसळले आणि आता मुदतपूर्व निवडणुकांशिवाय पर्याय नाही असाच भाजपचा होरा होता कारण शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात सत्तेसाठीही एकवाक्यता होणार नाही याची भाजपला खात्री वाटत होती. मात्र तीन पक्ष एकत्र आले आणि त्या पक्षांनी अडखळत का होईना सरकार स्थापन केले. तेव्हापासून भाजपला हे सरकार किती दिवस टिकणार याची चिंता लागून राहिली आहे आणि भाजप नेत्यांच्या वक्तव्यातून ती अस्वस्थता ठळकपणे जाणवते. हिंमत असेल तर राज्यात पुन्हा निवडणुका घेऊन दाखवा ही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी त्याच भावनेचे दर्शन घडविते. वस्तुतः भाजपला विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या आणि शिवसेनेशी युती टिकविण्यासाठी भाजपने थोडा दिलदारपणा दाखविला असता तर युती सरकार सत्तेत आले असते आणि आता भाजपमध्ये जी अस्वस्थता पसरली आहे तशी ती पसरली नसती. मात्र आपल्याच पक्षात काय ते आधुनिक चाणक्य आहेत आणि आपण कोणत्याही पक्षाला राजकीय शह देऊ शकतो या फाजील आत्मविश्वासाने भाजपचा घात केला. शिवसेनेने भाजपची साथ सोडलीच; पण राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्याशी आघाडी करीत शिवसेनेने मुख्यमंत्रिपद मिळविले. तीन पक्षांचे सरकार असल्याने वास्तविक हे सरकार चालविणे म्हणजे तारेवरची कसरत. त्यातच सरकारमध्ये असणारे मंत्री हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा अधिक अनुभवी. शिवाय मंत्रिपदे तीन पक्षांत विभागली गेल्याने प्रत्येक पक्षाच्या वाट्याला आलेली मंत्रिपदे तुलनेने कमीच. साहजिकच शिवसेनेसह अन्य दोन्ही पक्षांत नाराजी पसरली. आता कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात देखील ऑपरेशन लोटस यशस्वी होईल अशी भाजप नेत्यांची धमकी पुन्हा पोकळ निघाली. नागरिकत्व कायदा असो किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुद्दा असो किंवा अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा असो किंवा कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणी समांतर चौकशीचा मुद्दा असो; शिवसेनेची सरकारमध्ये सहभागी होण्यापूर्वी असणारी भूमिका आणि त्याच मुद्द्यांवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या भूमिका यात मोठी तफावत होती. किंबहुना त्यामुळेच हे मुद्दे अधिक पेटवत ठेवत शिवसेनेची कोंडी करून सरकारमध्ये मतभेद निर्माण करण्यावर भाजपचा भर उद्धव ठाकरे सरकार सत्तेत आल्याच्या पहिल्या दिवसापासून आहे. अद्यापि तरी भाजपच्या या डावपेचांना यश आल्याचे दिसत नाही. अयोध्येला उद्धव ठाकरे लवकरच भेट देतील असे शिवसेनेने जाहीर केले आहे. तेव्हा त्या मुद्द्यावर देखील भाजपची खेळी यशस्वी ठरली नाही. भाजपच्या खेळी अयशस्वी ठरण्याचे मुख्य कारण म्हणजे महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांतील त्रुटी न दाखविता किंवा सरकारच्या उणिवा न दाखविता भाजप केवळ शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. याची दोन कारणे संभावितात. एक तर शिवसेनेशी भाजपचे गेल्या पाव शतकाचे संबंध होते आणि हिंदुत्व हा त्यांमधील समान दुवा होता. शिवसेनेला प्रामुख्याने हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून छेडले की शिवसेनेला काही तरी ठोस भूमिका घ्यावी लागेल आणि ती शिवसेनेच्या आजवरच्या भूमिकेपेक्षा निराळी आणि पातळ झालेली आहे, असे चित्र निर्माण झाले तर शिवसेनेची गोची होणार कारण मग ती सत्तेसाठी केलेली तडजोड दिसणार. उलट शिवसेनेने आपण कोणतीही तडजोड केलेली नाही हे सिद्ध करण्याच्या नादात कठोर भूमिका घेतली तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या सत्तेतील भागीदार पक्षांशी बिनसणार. या सगळ्याचा परिणाम मतभेद निर्माण होण्यात होणार आणि अखेर हे सरकार या मतभेदांच्या ओझ्याखाली कोसळणार हा भाजपचा हिशेब आहे. तथापि भाजपचे हे डावपेच आतापर्यंत यशस्वी ठरलेले नाहीत कारण महाविकास आघाडी सरकार हे एक तर तीन महिन्यांपूर्वीच सत्तेत आले आहे. किमान समान कार्यक्रमावर हे सरकार बेतलेले आहे असे कितीही दावे करण्यात आले तरी किमान आणि समान असे काही असेल तर ती म्हणजे सत्ता हेच खरे आहे. शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसशी भागीदारी करीत सरकार स्थापन केले तेव्हाच खरे तर तडजोड केली आहे असे म्हटले पाहिजे. तेव्हा शिवसेनेला रोज आव्हाने देऊन भाजपची शक्ती खर्ची पडेल; पण त्यातून शिवसेना आक्रमक होऊन हे सरकार कोसळेल हे संभवत नाही. तेव्हा भाजपने एकट्या शिवसेनाला सातत्याने आव्हान देणे आणि भूमिका स्पष्ट करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करणे यातून लगेच काही साध्य होईल असे नाही झाले तर एवढेच निष्पन्न होईल की भाजप सत्तेसाठी उतावीळ झाला आहे याचे दर्शन घडेल.