“भाजपचं करोनाविरोधी लढ्याऐवजी ‘मिशन उत्तर प्रदेश’कडे लक्ष”

मुंबई – साधारण वर्षभराने उत्तर प्रदेशसह काही राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी भाजप कामाला लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे करोनाविरोधी लढ्याऐवजी मिशन उत्तर प्रदेशकडे लक्ष आहे, असे टीकास्त्र शिवसेनेने सोडले आहे.
गंगा नदीत मृतदेह वाहत असल्याची छायाचित्रे जगभरात प्रसिद्ध झाली. त्या छायाचित्रांनी मोदी आणि उत्तर प्रदेश सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. भाजपच्या प्रतिमेस तडे गेले. आता बिघडलेली प्रतिमा सुधारण्यासाठी आणि उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकण्यासाठी काय करायचे यावर भाजपमध्ये चिंतन आणि मंथन सुरू झाले आहे, असे विश्लेषण शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून करण्यात आले आहे.
त्यासाठी संघ आणि भाजप नेत्यांच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीचा संदर्भ घेण्यात आला आहे. अग्रलेखातून भाजपने आगामी निवडणुकांसाठी चालवलेल्या कथित तयारीची खिल्ली उडवण्यात आली आहे. मोठा गाजावाजा करूनही भाजपला पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवता आला नाही.
उत्तर प्रदेशातही तीच गत होऊ नये, यासाठी तो पक्ष कामाला लागला आहे. करोनाविरोधी लढ्याऐवजी पुन्हा एकदा निवडणुकांनाच प्राधान्य मिळत आहे. निवडणुका मागेपुढे झाल्याने आकाश कोसळणार नाही. सध्या संपूर्ण लक्ष करोनाविरोधी लढ्याकडेच देणे गरजेचे आहे; अन्यथा गंगेची फक्त शववाहिनी होऊन जगात आपली नाचक्की होईल, असा इशारा देण्यात आला आहे.


