वडगाव मावळ – मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्या पासून मावळातील सर्वच पक्षांनी आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली होती. भाजपने तर सर्व पक्षीय मदत घेऊन परिवर्तन पॅनल तयार केला होता. मात्र महाविकास आघाडीने भाजपचा “करेक्ट कार्यक्रम’ केला. 18 पैकी 17 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. तर अवघ्या एका जागेवर भाजपला समाधान मानावे लागले.
या निवडणुकीत आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने सहकार पॅनल उभे केले होते. तर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भाजपने निवडणूक जाहीर झाल्या पासूनच स्वबळावर निवडणूक लढण्याचे रणशिंग फुंकले होते. यासाठी त्यांनी विकास सोसायटयांच्या निवडणुकीत विशेष लक्ष घातले होते. त्यामुळे भाजप महाआघाडी समोर तगडे आवाहन देईल, असे वाटत होते. मात्र निवडणूक एकतर्फा झाली आणि भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले