#Punjab Election 2022: भाजपची सिद्धूंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

नवी दिल्ली – कॉंग्रेसचे पंजाब प्रदेशाध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांच्या विरोधात भाजपने सोमवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. समाजाची विभागणी करत असल्याबद्दल सिद्धू यांच्यावर प्रचारबंदी घालावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली.
पंजाबमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक प्रचारामुळे त्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अशात सिद्धू यांच्या काही वक्तव्यांवर भाजपने आक्षेप घेतला आहे.
समाजातील एका घटकाला सिद्धू यांनी मतांमध्ये फाटाफूट होऊ न देण्याचे आवाहन केले. तर, एका वर्गाचा त्यांनी अवमान केला. त्यांची वक्तव्ये समाजात द्वेष निर्माण करणारी आहेत. ती वक्तव्ये निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारी आहेत, अशी भूमिका भाजपने घेतली. तसे निवेदन भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे सादर केले. त्या शिष्टमंडळामध्ये केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचाही समावेश होता.





