चंद्रकांत पाटलांनी बारामतीत घेतले भाडेतत्त्वावर घर : अजित पवारांविरोधात कंबर कसली
बारामती – महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीत मोर्चेबांधणी केली होती, आता विधानसभेला अजित पवार यांच्याविरुद्ध बारामतीत भाजपने कंबर कसली आहे. वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो आम्ही मान्य करू मात्र, भाजप या जागेवर लढण्यास उत्सुक आहे, अशी माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. 13) बारामतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी चंद्रराव तावरे, रंजन तावरे, प्रशांत नाना सातव, अविनाश मोटे, प्रवीण आटोळे, पांडुरंग कचरे, पृथ्वीराज जाचक, शिवाजी निंबाळकर, ऍड. जी. बी. गावडे, राजेश कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. बारामतीच्या जागेवर भाजप दावा सांगणार असून आम्ही बारामतीची जागा लढविण्यास उत्सुक आहोत, असे अविनाश मोटे यांनी सांगितले. देशातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष विधानसभेच्या बारामती मतदारसंघावर दावा सांगणार आहे. या लढाईसाठी चंद्रकांत पाटील यांनी बारामतीतील प्रशासकीय इमारती समोरील सृष्टी कॉम्प्लेक्समध्ये भाडेतत्त्वावर घर घेतले, असल्याची माहिती मोटे यांनी दिली.