भोरमध्ये भाजपचेही आव्हान
बाळू शिंदे
उमेदवारीसाठी 12 जण इच्छुक : शिवसेनेची यंत्रणाही आक्रमक
कापूरहोळ – भोर मतदार संघात कॉंग्रेस आणि थोपटे यांच्या घराणेशाही विरोधात शिवसेना आक्रमक झालेली असतानाच भारतीय जनता पक्षानेही या विधानसभा मतदार संघात तयारी सुरू केली आहे. ऐनवेळी युतीचा निर्णय फिस्कटलाच तर कॉंग्रेसचे प्रबळ उमेदवार संग्राम थोपटे यांच्या विरोधात शिवसेना, भाजप तसेच रासपसह अन्य पक्षांचेही आव्हान असणार आहे.
भोर मतदार संघावर कॉंग्रेस पक्षाची मजबूत पकड असल्याचे वेळावेळी स्पष्ट झाले आहे. 2014 मध्ये मोदी लाटेत देशासह महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाची धुळधाण झाली. पुणे जिल्ह्यात भोरसह, इंदापूर, पुरंदरमध्येही कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. परंतु, गेल्या पंचवार्षिकला केवळ भोरचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यात कॉंग्रेस पक्षाला यश आले होते. भोरमध्ये आमदार संग्राम थोपटे दुसऱ्यांदा निवडून आले होते.
यावेळी त्यांची ही तिसरी टर्म असणार आहे. त्यामुळे थोपटे यांची “हॅट्रीक’ रोखण्याकरीता शिवसेनेसह भाजप पक्षाही सरसावला आहे. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबरही कॉंग्रेसच्या आघाडीचा निर्णय अद्याप झालेला नाही. यामुळेच राष्ट्रवादीचे या मतदार संघातील पदाधिकारीही कॉंग्रेस विरोधात कुरघोड्या करू लागले आहेत. आघाडीचा निर्णय झाला नाही तर कॉंग्रेसला ही निवडणूक जड जाऊ शकते. हिच पार्श्वभुमी लक्षात घेत शिवसेना आतापासूनच कॉंग्रेसच्या विरोधात उरतरली आहे.
भोर विधानसभेसाठी शिवसेनेकडून प्रबळ दावेदार मानले जात असलेले कुलदीप कोंडे यांनी जनजागृती यात्रेद्वारे रणशिंग फुंकले आहे. लोकप्रतिनिधी बदला परिस्थिती बदलेल, अशी घोषणा घेऊन कोंडे हे जनतेसमोर जात आहेत. थोपटे यांचे वर्चस्व असलेल्या वीस गाव खोऱ्यातील आंबाडे येथून या पदयात्रेची सुरुवात कोंडे यांनी केल्यानंतर प्रमुख गावांतून त्यांनी कॉंग्रेसलाच टार्गेट केले. पाहिल्या टप्यात भोर आणि वेल्हे नंतर दि. 5 ते 9 सप्टेंबरमध्ये कोंडे हे मुळशी तालुक्यात जात आहेत.
थोपटे कुटुंबियांनी भोर मधील साध्या भोळ्या जनतेचा गैरफायदा घेत अंगारे धुपाऱ्यांची शपथ देत तसेच धमकावून मते मागीतलेली आहेत. या मतदारसंघातील रस्ते, वीज, पाणी वीज असेही प्रश्न रखडले आहेत तसेच कोणताही प्रकल्प गेल्या 40 ते 50 वर्षात येथे झाला नाही, असे थेट आरोप कॉंग्रेसवर होत असल्याने भोरमध्ये सध्या शिवसेनेचा बोलबोला वाढू लागला आहे. भोर आणि वेल्हेत कुलदीप कोंडे यांनी यात्रेच्या माध्यमातून कॉंग्रेस टार्गेट केलेली असतानाच शिवसेनेच्या अन्य दावेदारांपैकी बाळासाहेब चांदेरे यांनीही मुळशीत आपला पॅटर्न राबविण्यास सुरूवात केली आहे.
या दोन्ही उमेदवारांपैकी कोणीही मैदानात आला तरी कॉंग्रेसला ही निवडणूक जिंकण्यासाठी झगडावे लागणार आहे. शिवसेनेचे भोर तालुका प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे, दिपक बर्डे, वेल्हे तालुका प्रमुख शैलेश वालगुडे, मुळशीचे तालुका प्रमुख संतोष मोहळ, युवासेना प्रमुख केदार देशपांडे, नितीन सोनवले, अशोक वाडकर, प्रफुल्ल धुमाळ, नितीन इंगुळकर, युवराज जेधे, अमोल पांगारे व सर्व पदाधिकाऱ्यांसह शेकडो शिवसैनिकांनी कॉंग्रेसची सत्ता उलथविण्याकरीता भगवा हाती घेतला आहे.
भोर मतदार संघात शिवसेना अशारितीने आक्रमक होत असतानाच भारतीय जनता पक्षानेही भोरसाठी तयारी केली आहे. यानुसार या मतदारसंघातील भाजपच्या इच्छुकांया मुलाखती मंगळवारी (दि. 27) घेण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यात बाळासाहेब गरुड, प्रदिप खोपडे, विनायक ठोंबरे, गोरख दगडे, किरण दगडे, भगवान पासलकर, आण्णा शिंदे, राजेंद्र बांदल, जिवन कोंडे, विठ्ठल शेलार, चंदू भैय्या परदेशी, उल्हास खुटवड अशा मातब्बरांनी भोरमधून लढण्याची तयारी दर्शविली आहे.
भोर कॉंग्रेस आताच शांत?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शिव स्वराज्य यात्रा, भाजपकडून महाजनादेश यात्रा, शिवसेना भोरची जनजागृती यात्रा यासह विधानसभेसाठी अन्य पक्षांनी तयारी केलेली असताना भोरमध्ये कॉंग्रेसमध्ये मात्र आताच शांतात दिसत आहे. यामागे पक्ष बदलाची कारणे आहेत की काय? अशीही चर्चा असून या कारणातून कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांतही संभ्रमावस्था निर्माण झाल्याची चर्चा आहे.





