मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, भारतीय जनता पक्षाने (भाजप) निवडणुकीआधीच मोठी आघाडी घेतली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपने १०० नगरसेवकांची बिनविरोध निवड करून ‘शतकी’ टप्पा पार केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे हा बिनविरोध निवडीचा दावा त्यांनी केला आहे. दोंडाईचा नगरपरिषद १००% बिनविरोध धुळ्यातील दोंडाईचा नगरपरिषद (Dondaicha Nagar Panchayat) याचे ज्वलंत उदाहरण ठरले आहे. मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखालील या नगरपरिषदेतील सर्व २६ जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यासह सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत देखील बिनविरोध झाली आहे. विभागांनुसार बिनविरोध नगरसेवकांचे चित्र: विभाग बिनविरोध नगरसेवक संख्या उत्तर महाराष्ट्र ४९ पश्चिम महाराष्ट्र ४१ कोकण ४ मराठवाडा ३ विदर्भ ३ एकूण १०० यासह ३ नगराध्यक्ष देखील बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यातील २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींसाठी येत्या २ डिसेंबरला मतदान होणार असून, ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी (२१ नोव्हेंबर) भाजपच्या बिनविरोध निवडीचा आकडा १०० वर पोहोचला आहे.