प्रभात वृत्तसेवा आळंदी – नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 5 मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संतोष रासकर आणि खुशी बोरुंदिया यांनी आपला प्रचार अंतिम आणि निर्णायक टप्प्यात नेला आहे. आज या पॅनेलने वृंदावन कॉलनी परिसर, 4 नंबर शाळेमागील भाग, कोकण विभाग धर्मशाळेचा मागील भाग, तुळजाभवानी मंदिर परिसर, तसेच तनिष वाटिका सोसायटी, विश्वज्योत सोसायटी, सोपान जय पार्क सोसायटी आणि सोपान साई सोसायटी अशा महत्त्वाच्या भागांमध्ये घरोघरी जाऊन जनसंवाद साधला. या प्रचार दौर्यात संतोष रासकर यांनी प्रभागातील प्रलंबित पायाभूत सुविधांची कामे प्राधान्याने मार्गी लावण्याची ग्वाही दिली. त्यांच्या नेतृत्वावर येथील मतदारांनी विश्वास व्यक्त केला आहे. दुसरीकडे, युवा उमेदवार खुशी बोरुंदिया यांनी आपल्या उत्साही आणि थेट संवादातून तरुणाई आणि महिला मतदारांना आकर्षित केले. त्यांनी महिलांसाठी सुरक्षितता वाढवणारे सीसीटीव्ही जाळे, तरुणांसाठी कौशल्य विकास केंद्रे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे उभारण्याची योजना मतदारांसमोर ठेवली. त्यांचा हा सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा दृष्टिकोन प्रभागात चर्चेचा विषय ठरला आहे.या दोन्ही उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांचे आशीर्वाद घेतले. या जनसंवादामुळे मतदारांना उमेदवारांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली, ज्यामुळे त्यांच्या समस्यांची नोंद घेतली गेली. त्यांनी सांगितले की, मतदारांकडून मिळालेला हा उत्साही आणि सकारात्मक प्रतिसाद पाहता, प्रभाग 5मध्ये विकासपर्वाची सुरुवात करण्यासाठी मतदारांनी भाजप पॅनेलवर विश्वास दाखवल्याचे स्पष्ट होत आहे. अनुभवी आणि तरुण नेतृत्वाच्या या संयोगाने विकासाची नवी पहाट येणार असल्याचा आत्मविश्वास भाजप कार्यकर्त्यांना आहे. 2 डिसेंबरला मतदान होणार असून जनसेवा नागरिकांनी जनसेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन दोन्ही उमेदवार यांनी केले आहे.