मुंबई : भाजप नेतृत्व मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा ठाकरेसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नेत्यांना गळाला लावण्यावरून महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांचे हे वक्तव्य आले आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र, राऊत यांचे आरोप फेटाळून लावत, त्यांचे बोलणे निराशेतून आले असल्याचे म्हटले. पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, अमित शहा शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला संपवणार आहेत. त्यांनी आमच्यासोबतही असेच करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही वाचलो. त्यांच्या गटाला शिवसेना म्हणतात हे मी मान्य करायलाही तयार नाही. लोक माझा दावा लक्षात ठेवू शकतात की एक दिवस शहाच पक्ष संपवतील. त्यांच्या कार्यपद्धती आणि मित्रपक्षांशी वागण्याच्या परंपरेनुसार, दिल्ली शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना संपवणार असल्याचे ते म्हणाले.