भाजप बहुमताने सरकार स्थापन करणार : मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान

Elections Result 2023 : मतमोजणीदरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भारत माता की जय, जनता जनार्दन की जय असे ट्विट केले. ‘आज मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल येत आहेत आणि मला विश्वास आहे की जनतेच्या आशीर्वादाने आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमताने पुन्हा सरकार स्थापन करणार आहे. भाजपच्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन.’
मध्य प्रदेशात सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरूवात पोस्टल मतपत्रिकांच्या मोजणीने झाली. राज्यात 17 नोव्हेंबरला निवडणुका झाल्या आणि निकाल समोर येणार आहे.
मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. मध्य प्रदेशातील सर्व 230 विधानसभा जागांसाठी ट्रेंड समोर आले आहेत. सुरुवातीलाच भारतीय जनता पक्षाने बहुमताचा आकडा पार केला आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजप 140 जागांवर आघाडीवर असून काँग्रेस 86 जागांवर आघाडीवर आहे, तर इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत. छिंदवाडा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री कमलनाथ 6,978 मतांनी आघाडीवर आहेत.





