जे. पी. नड्डांनंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार? ‘या‘ नेत्यांची नावे चर्चेत

BJP President Election: एकीकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू असताना, भाजपचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल ? या चर्चेने देखील वेग पकडला आहे. सध्या भाजपकडून राज्यस्तरावर संघटनात्मक बदल सुरू आहेत. काही राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांची नेमणूक देखील करण्यात आली आहे. त्यानंतर आता पक्षाकडून नवीन राष्ट्रीय अध्यक्ष नेमणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नवीन पक्ष अध्यक्षपदासाठी काही नेत्यांची नावे देखील चर्चेत आहेत.
जे. पी. नड्डा यांच्याकडे 2020 मध्ये पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ जानेवारी 2024 मध्ये समाप्त झाला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे कार्यकाळात वाढ करण्यात आली होती. भाजप दिल्ली विधानसभा निवडणूक देखील त्यांच्या अध्यक्षतेखाली लढवत आहे.
राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक करण्यापूर्वी राज्यस्तरावर कमीत कमी 50 टक्के संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे. रिपोर्टनुसार, भाजपकडून दिल्ली विधानसभा निवडणुका झाल्यावर 10 फेब्रुवारीच्या दरम्यान नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते.
भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ही नावे चर्चेत
भाजपचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हे ठरण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वाची भूमिका असू शकते. भाजपच्या अध्यक्षपदासाठी सध्या केंद्रीयमंत्री शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल खट्टर, धर्मेंद्र प्रधान आणि विनोद तावडे ही नावे चर्चेत आहेत. याशिवाय, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. मात्र, भाजपकडून ऐनवेळी नवीन नावाची घोषणा करून सर्वांना धक्का दिला जाऊ शकतो.





