भंडारा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर भंडारा जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. तुमसर-मोहाडी विधानसभा प्रमुख व प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. पत्रकारपरिषदेत ते भावूक होऊन ढसाढसा रडले आणि स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केले. “स्थानिक नेत्यांनी माझा घात केला. जातीवाद व परिवारवादाचे आरोप चुकीचे आहेत. यापुढे मी फक्त साधा कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी काम करेन,” असे उद्गार पडोळे यांनी काढले. त्यांच्या राजिनाम्यामुळे जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. दुसरीकडे, भाजपला दिलासा देणारी बातमी म्हणजे माजी आमदार बाळा काशीवार यांची पक्षात जोरदार घरवापसी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार परिणय फुके यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याने भंडारा जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याचा दावा पक्षाकडून केला जात आहे. एकाच दिवशी एका बड्या नेत्याचा राजीनामा आणि दुसऱ्या माजी आमदाराचा प्रवेश, या घडामोडींमुळे भंडारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.