ठाणे : राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये थेट भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर, पुण्यासह विविध ठिकाणी या संघर्षाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीत, दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांचे पदाधिकारी फोडू नयेत, असा अलिखित समझोता असतानाही ठाणे जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या तीन माजी नगरसेवकांना शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थित आज प्रवेश केला. या प्रवेशावेळी संबंधित माजी नगरसेवकांनी भाजप नेते आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली. मिरा-भाईंदरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये चुरशीची लढत सुरू असतानाच ही महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. भाजप नेते नरेंद्र मेहता यांच्या कथित हुकूमशाही कारभाराला कंटाळून भाजपच्या माजी नगरसेविका दीपाली मोकाशी, वीणा भोईर तसेच माजी नगरसेवक सूर्यकांत भोईर यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. पक्षप्रवेशानंतर प्रताप सरनाईक म्हणाले, “या सर्व नेत्यांना शिवसेनेत सन्मानाची व महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल. मिरा-भाईंदर शहरात सध्या भगव्याची लाट असून, जो कोणी भगवा हाती घेईल त्याच्या पाठीशी शिवसेना आणि प्रताप सरनाईक ठामपणे उभे राहतील.” दरम्यान, शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांनी भाजपवर गंभीर आरोप केले. अनेक वर्षे पक्षात काम करूनही उमेदवारी नाकारण्यात आली, तसेच भाजपमध्ये फक्त नरेंद्र मेहता यांचे जवळचे मित्र आणि ठेकेदारांनाच प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या पक्षप्रवेशामुळे मिरा-भाईंदरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा भाजपसाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.