प्रभात वृत्तसेवा आळंदी – आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपचे उमेदवार संतोष रासकर आणि खुशी बोरुंदिया यांनी आपला प्रचार आता अंतिम टप्प्यात आणला आहे. प्रचारप्रमुख सागर बोरुंदिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पॅनेलने आज शुक्रवारी वृंदावन कॉलनी परिसर, चार नंबर शाळेसमोरील परिसर तसेच चर्होली रोड, गुरुनाथ लॉज गल्ली आणि अनिल कुर्हाडे गल्ली यांसारख्या उर्वरित भागांमध्ये घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला. यादरम्यान, संतोष रासकर यांनी पायाभूत सुविधांचा आराखडा मतदारांसमोर मांडला, तर तरुण उमेदवार खुशी बोरुंदिया यांनी महिला सुरक्षा, युवा कौशल्य विकास, प्रभागाचा सर्वांगिण विकास योजनांवर भर दिला. रासकर-बोरुंदिया यांच्या पॅनेलने प्रचारात थेट जनसंवादावर लक्ष केंद्रित केले आहे. खुशी बोरुंदिया यांनी प्रत्येक कुटुंबातील सदस्यांशी व्यक्तिगत संवाद साधत, माय-भगिनींचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या सकारात्मक आणि उत्साही नेतृत्वाला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. प्रचारादरम्यान नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याची ग्वाही दोन्ही उमेदवारांनी दिली आहे. प्रभागातील नागरिकांचा स्वच्छता, सुरक्षितता आणि सुटसुटीत वाहतूक व्यवस्थेवर असलेला कल लक्षात घेऊन या पॅनेलने सादर केलेला विकासकेंद्री आराखडा मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करत आहे. प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, अनुभवी नेतृत्वाचा आधार आणि तरुण नेतृत्वाचा उत्साह घेऊन मैदानात उतरलेल्या या भाजप पॅनेलच्या बाजूने मतदारांचा कल स्पष्टपणे झुकत असल्याचे चित्र प्रभाग 5 मध्ये दिसत आहे.