वडोदरा – भाजपच्या वतीने 29 व 30 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या युनिटी मार्चसाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते व कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना पत्राद्वारे निमंत्रण देण्यात आले असून त्यांनी पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे, असे भाजप खासदार हेमांग जोशी यांनी सांगितले. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सन्मानार्थ सरकारकडून या मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रामध्ये जोशी यांनी, भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी वचनबद्ध असलेला नागरिक म्हणून आपण या पदयात्रेत सहभागी व्हावे. आपली उपस्थिती ही एकात्मतेच्या मुद्द्यावर देशाला, आपण एक आहोत असा शक्तिशाली संदेश देऊ शकेल. आपल्या वैचारिक मतभेदांकडे दुर्लक्ष करुन आपण एकत्र चालू शकतो, असे आवाहन देखील जोशी यांनी केले.