भाजप शिवसेना केवळ इतर पक्षातील नेते फोडण्याचे काम करतेय- धनंजय मुंडे

बाळानगर: शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात आज पैठण येथे संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन झाली. त्यानंतर बाळानगर येथे झालेल्या पहिल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रसेचे विधान परिषदचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभेला संबोधित करताना फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.

धनंजय मुंडे म्हणाले की, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्नरण करत, चला देऊ मोदींना साथ, अशी घोषणा दिली. मात्र त्यानंतर पाच वर्ष मुख्यमंत्र्यांच्या यात्रेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा साधा उल्लेखही नाही. हा महापुरुषांचा अपमान इथे सहन केला जाणार नाही. धनंजय मुंडे यांनी पाच वर्षांतील सरकारच्या कारभारावर भाष्य केले.

भाजप शिवसेना केवळ इतर पक्षातील नेते फोडण्याचे काम करतेय. इतक्या खालच्या पातळीवर राजकारण कधी महाराष्ट्रात घडले नव्हते. भ्रष्टाचाराचे आरोप असताना देखील काही नेत्यांना भाजपात घेतले. मग आता त्यांचा भ्रष्टाचार गेला कुठे? पूरग्रस्त बांधवांचे कुटुंब पुन्हा उभे राहावे यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पूरग्रस्तांना धीर दिला. पूरग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागले म्हणून १४४ कलम लागू करावे लागले. पण, मुख्यमंत्री आणि राज्याचे युवराज यात्रांमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले, अशी टीका मुंडे यांनी केली.

अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रावर पूरस्थिती ओढावल्यानंतर अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तातडीने सांगली, सातारा, कोल्हापूरात काम सुरु केले. राष्ट्रवादीचे सर्वच नेते शक्यतोपरी मदत करत आहेत. पण हे सरकार प्रचंड असंवेदनशील असल्याचे दिसून आले. पुरात माणसांचे प्राण गेले, आणि यांचे मंत्री फोटो काढत फिरले. ही कसली टिंगलटवाळी चालली आहे ? या सरकारला कसली मस्ती आहे ? असा जाब पवार यांनी सरकारला विचारला.

सरकार असमर्थ असल्यामुळे अजूनपर्यंत सरसकट कर्जमाफी मिळाली नाही. शिवसेना पीकविमा कंपन्यांविरोधात मुंबईत आंदोलन करते. पण त्यांना रब्बी व खरीप हंगाम कळत नाही. सरकारच्या काळात एअर इंडिया, बीएसएनएल, एमटीएनएल, एअरसेल अशा असंख्य कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आहे. उद्योगपती आत्महत्या करत आहेत. महाराष्ट्रासाठी अलमट्टी धरणाचे पाणी सोडण्यासाठी योग्य वेळी निर्णय घेता आला नाही. मग, हे सरकर करतयं तरी काय? असे सवाल अजित पवार यांनी उपस्थित केले.

या सभेत खासदार अमोल कोल्हे यांनी देखील सरकारच्या निष्क्रियतेवर सडकून टीका केली. शिवस्वराज्य यात्रा का काढताय? असे प्रश्न भाजपा-शिवसेनावाले आम्हाला करत आहेत, पण शिवाजी महाराज काय तुमची एकट्याची जहांगीर आहे का? असा प्रश्न त्यांनी केला. पाच वर्षांत महाराष्ट्राचा खेळखंडोबा या सरकारने केल्याचे सांगत अमोल कोल्हे यांनी रोजगार, उद्योग धंदे, योजना अशा अनेक अपयशी निर्णयांची रितसर हजेरी घेतली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)