KDMC Election 2026 | महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर डोंबिवलीत मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. डोंबिवली भाजप- शिंदेसेना हाणामारी प्रकरणात शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना हॉस्पिटलमधून पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रभाग क्रमांक २९ मधील भाजप उमेदवाराच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांना अटक केली आहे. शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना पोलिसांनी अटक केल्यानंतर शिंदे गट आक्रमक झाला असून कल्याण-डोंबिवलीतील वातावरण चांगलंच तापलं होते. शिवसैनिकांनी शास्त्रीनगर रुग्णालयाबाहेर प्रचंड गोंधळ घातल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काय आहे नेमकं प्रकरण? डोंबिवली प्रभाग २९ च्या भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत रवी पाटील आणि नितीन पाटील यांनी जाब विचारला. यातूनच वाद विकोपाला गेला आणि दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हल्ल्यात ओमनाथ नाटेकर गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी १० ते १२ जणांवर गुन्हे दाखल केले होते. या हाणामारीत चार जण जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी सोमनाथ नाटेकर यांच्या तक्रारीवरून शिवसेनेचे उमेदवार रवी पाटील, नितीन पाटील यांच्यासह ५ जणांविरोधात प्राणघातक हल्ल्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात पाच जणांना अटकही करण्यात आली आहे. KDMC Election 2026 | याआधी भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत शिवसेनेचे उमेदवार रवी पाटील आणि नितीन पाटील यांनी ३ पुरुष आणि १ महिला भाजप कार्यकर्त्यांना पकडले होते. मात्र, यावेळी पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल न केल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती. KDMC Election 2026 | रुग्णालयातून उमेदवारांना घेतलं ताब्यात दरम्यान, हाणामारीत जखमी झालेले भाजप उमेदवारांचे पती ओमनाथ नाटेकर यांच्यावर आणि शिवसेना उमेदवार नितीन पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शिवसेना उमेदवार नितीन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून शिवसेना उमेदवारांना अटक करण्याची मागणी करत आंदोलन केले होते. या मागणीनंतर मध्यरात्री पोलिसांनी रवी पाटील आणि नितीन पाटील यांना उपचार सुरू असलेल्या रुग्णालयातून ताब्यात घेतले. मात्र ताब्यात घेतल्यानंतर दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांना डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकीकडे प्रभाग २९ मध्ये भाजप आणि शिवसेना मैत्रीपूर्ण लढत असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र पैसे वाटप आणि मारहाणीच्या आरोपांनंतर आता दोन्ही पक्ष थेट आमनेसामने आलेले पाहायला मिळत आहेत. हेही वाचा : PMC Election: आपला प्रभाग विकासाचे रोल माॅडेल असेल; हर्षवर्धन मानकर यांचा मतदारांना शब्द