नवी दिल्ली – बिहारमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका भाजप, संयुक्त जनता दल आणि लोक जनशक्ती पार्टी एकत्र लढवणार आहेत, अशी माहिती भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी रविवारी दिली.
या निवडणुकीत ही आघाडी विजयी होणार असल्याचा विश्वासही नड्डा यांनी व्यक्त केला. हा विजय केवळ भाजपसाठीच नव्हे, तर आघाडीतील अन्य पक्षांसाठीही महत्त्वाचा असणार आहे, असेही ते म्हणाले. बिहारमधील भाजपच्या कार्य समितीला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित करताना ते बोलत होते.
भाजपने केंद्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर केलेल्या लोककल्याणकारी कामाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवहन नड्डा यांनी याप्रसंगी पदाधिकाऱ्यांना केले.
सध्याच्या साथीच्या वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आलेली कोविड-19 च्या उपचारांसाठी रुग्णालये, मास्कचे आणि पीपीई किटचे व्यापक उत्पादन यांचाही उल्लेख नड्डा यांनी या प्रसंगी केला.