BJP Protest In PCMC – इतिहास काळापासून काँग्रेस सातत्याने महिलांच्या विरोधात भूमिका घेत आहे. आता देखील नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करून समाजवादी पार्टी, काँग्रेस आणि इंडिया आघाडीने महामूर्खपणा केला आहे. त्यांना या देशातील महिला माफ करणार नाही असे म्हणते महापालिका सभागृहामध्ये सोमवारी (दि. २०) नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. काँग्रेसचा निषेध करत महापालिकेची सभा तहकूब करण्यात आली. यावेळी महापालिकेतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आंदोलन केले. केंद्र सरकारने २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपासून महिला आरक्षण लागू करण्यासाठी तीन विधेयक सादर केले. त्यामध्ये नारी शक्ती वंदन २०२३ मध्ये सुधारणा अधिनियम, सीमांकन आयोगाची स्थापना करण्यासाठी मतदारसंघाची पुनर्रचना आणि केंद्रशासित प्रदेशातील विधानसभांमध्ये महिला आरक्षण लागू करण्यासाठी विधेयक यांचा समावेश होता. मात्र, दोन तृतीयांश मते न पडल्याने ही विधेयके मागे घेण्याची नामुष्की केंद्र सरकारवर ओढावली. त्यामुळे विरोधात मतदान केलेल्या काँग्रेस, सपा आणि इंडिया आघाडीचा महापालिकेच्या सभागृहात निषेध करण्यात आला. नारी शक्ती वंदन अधिनियम. नगरसेविका योगिता नागरगोजे यांनी काँग्रेसच्या निषेधाचा ठराव मांडला. त्या म्हणाल्या, महिला आरक्षणावर केंद्रामध्ये शिक्कामोर्तब होणार होते. मात्र, इंडिया आघाडीने महिलांचा अवमान केला. अनुराधा गोरखे म्हणाल्या, महिलांना घाबरून त्यांनी विरोध केला. या गोष्टीचा निषेध करावा तितका कमी आहे. कुंदा भिसे म्हणाल्या, नारी शक्ती, मातृशक्ती काढून घेण्याचे काम इंडिया आघाडीने केले आहे. हा फक्त विरोध नाही तर महिलांवर आघात आहे. प्रियंका गांधी या महिला असून त्यांनी महिला आरक्षणासाठी असलेल्या विधेयकांचा विरोध केला. त्यामुळे सभा तहकूब करावी. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील टीका केली. नगरसेविका वर्षा जगताप म्हणाल्या, या मातीत महिलांना एक वेगळं स्थान आहे. आपल्या देशाच्या राजकारणात ३३ टक्के महिलांना आरक्षण कोणी दिले असेल तर ते शरदचंद्र पवार यांनी. मात्र, आताच्या काँग्रेसला महिलांची प्रगती पाहवत नाही. दिवंगत अजित पवार असते तर त्यांनी देखील या विधेयकाचे समर्थन केले असते असे सांगतानाच त्यांना अजितदादा पवारांच्या आठवणींने अश्रू अनावर झाले. अखेर महापौर रवी लांडगे यांनी महिलांच्या भावना लक्षात घेत महापालिकेची एप्रिल महिन्याची सर्वसाधारण सभा ५ मे दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब केली