शिक्रापूर – शिरूर तालुक्यातील एका शिक्षणसंस्थेतील शिपायाला नोकरीवरून काढून न टाकण्यासाठी तसेच भविष्यातील पेंशन मिळवून देण्यासाठी अडीच लाख रुपये लाच घेतल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य असलेले शिवाजीराव भुजबळ यांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. शिवाजीराव बाळासाहेब भुजबळ, मंगल शिवाजीराव भुजबळ व संदीप रंगनाथ गायकवाड असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्यांची नावे आहेत. मात्र शिवाजीराव भुजबळ यांचा माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याने खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य असलेले शिवाजीराव भुजबळ यांची शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालय ही शिक्षण संस्था आहे. भुजबळ यांची पत्नी संस्थेच्या अध्यक्ष पदावर आहे. शिक्षण संस्थेमध्ये तक्रारदार युवकाचे वडील शिपाई पदावर नोकरीला आहेत. ते नेहमी आजारी असल्याने त्यांना नोकरीवरून काढून न टाकण्यासाठी तसेच भविष्यात पेंशन योजना मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडे तीन लाख पन्नास हजार रुपयांची लाच मागण्यात आली, दरम्यान त्यांच्यामध्ये चर्चा होऊन दोन लाख पन्नास हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत शिक्षण संस्थेत शिपाई असलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने चंदननगर पुणे येथे तक्रारीची पडताळणी करीत सापळा रचला. दरम्यान तक्रारदार यांच्याकडून अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव बाळासाहेब भुजबळ (वय 62), मंगल शिवाजीराव भुजबळ (वय 62), लिपिक संदीप रंगनाथ गायकवाड (वय 40, सर्व रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरूर) यांना अटक केली आहे. तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सीमा आडनाईक करीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोची चर्चा………. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव भुजबळ हे पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत.त्यांची पक्षातील वरिष्ठ नेत्यांची अनेकदा बैठक होत असते. त्याप्रमाणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतचा फोटो काही ठिकाणी प्रसारीत झाला त्यामुळे सदर फोटोमुळे तालुक्यात चर्चा रंगली आहे.