चंडिगढ – पंजाबमधील सत्तारूढ आपने मंगळवारी भाजपला घेरत सनसनाटी आरोप केला. भाजपने आता पंजाब सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस सुरू केले आहे. त्याचा भाग म्हणून आमच्या 10 आमदारांना प्रत्येकी 25 कोटी रूपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा आपकडून करण्यात आला.
पंजाबचे अर्थमंत्री आणि आपचे नेते हरपालसिंग चीमा यांनी येथे पत्रकार परिषद घेऊन भाजपवर आरोपांची सरबत्ती केली. आपचे आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. काही आमदारांना पैसे आणि मंत्रिपदांची ऑफर देणारे फोन आले. संपर्क करणाऱ्यांनी दिल्लीत भाजपच्या बड्या नेत्यांशी भेट घडवून आणण्याची ग्वाही आमदारांना दिली. आमदारांना खरेदी करण्याचे प्रयत्न आठवडाभरापासून सुरू आहेत.
संपर्क साधण्यात आलेल्या आमदारांना आणखी आमदार बरोबर घेण्याचेही सांगण्यात आले. तसे झाल्यास आणखी पैसे देण्याची तयारी दर्शवण्यात आली. आपच्या आमदारांशी संपर्क साधणाऱ्या भाजपच्या सदस्यांपैकी काही जण पंजाबमधील, तर काही दिल्लीतील आहेत. त्याविषयीचा पुरावा आप योग्य वेळी सादर करेल, असे चीमा यांनी म्हटले. याआधी आपने भाजपवर दिल्ली सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. तसेच, दिल्लीतील ऑपरेशन लोटस फसल्याचाही दावा केला होता.
दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यांत आपची सत्ता आहे. पंजाबमध्ये काही महिन्यांपूर्वीच विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत आपने घवघवीत यश मिळवले. त्या पक्षाने 117 पैकी तब्बल 92 जागा पटकावल्या. पंजाबची सत्ता गमवावी लागलेल्या कॉंग्रेसला केवळ 18 जागांवर समाधान मानावे लागले. तर, भाजपला अवघ्या 2 जागा मिळाल्या.
भाजपने तयार ठेवलेत 1 हजार 375 कोटी रूपये
पंजाबमधील सुमारे 55 आमदार फोडण्याचा भाजपचा प्लॅन आहे. त्यासाठी त्या पक्षाने 1 हजार 375 कोटी रूपये तयार ठेवले आहेत, असा आरोप चीमा यांनी केला. आपच्या एका आमदाराने संपर्क करणाऱ्यांना पंजाब सरकार कसे काय पाडता येऊ शकेल, असा प्रश्न विचारला. त्यावर इतर पक्षांचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. आणखी केवळ 35 आमदारांची गरज असल्याचे उत्तर संबंधित आमदाराला देण्यात आले. त्यामुळे पंजाबमधील कॉंग्रेस आमदारांशीही संपर्क साधला गेला असावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. पंजाब विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी किमान 59 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.