BJP News : भाजपला मोठा धक्का ! ‘या’ दिग्गज नेत्याने दिला राजीनामा
भारतीय जनता पक्षाला (BJP News) दक्षिण भारतात, विशेषतः तामिळनाडूमध्ये एक मोठा राजकीय हादरा बसला आहे. भाजपचे आक्रमक आणि वरिष्ठ नेते के. अन्नामलाई यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

BJP News : भारतीय जनता पक्षाला (BJP News) दक्षिण भारतात, विशेषतः तामिळनाडूमध्ये एक मोठा राजकीय हादरा बसला आहे. भाजपचे आक्रमक आणि वरिष्ठ नेते के. अन्नामलाई यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
त्यांनी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेऊन आपला राजीनामा (BJP News) त्यांच्याकडे सोपवला. माजी आयपीएस अधिकारी असलेल्या अन्नामलाई यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
अंतर्गत मतभेद आणि नाराजी नाट्याची पार्श्वभूमी
काही महिन्यांपूर्वीच भाजप (BJP News) हाय कमांडने अन्नामलाई यांना तामिळनाडूच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदावरून हटवले होते. त्यांच्या जागी नैनार नागेंद्रन यांची नियुक्ती करण्यात आली होती. या फेरबदलानंतर अन्नामलाई पक्षात नाराज असल्याचे बोलले जात होते. “सध्याच्या परिस्थितीत भाजपमध्ये मला कोणतेही भविष्य दिसत नाही,” असे स्पष्ट भाष्य करत त्यांनी स्वतःच पक्षातून बाहेर पडण्याचे संकेत दिले होते. अखेर त्यांनी राजीनामा देऊन या चर्चांवर शिक्कामोर्तब केले आहे.
वरिष्ठ नेत्यांकडून मनधरणीचे प्रयत्न सुरू
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीनामा देण्यापूर्वी दिल्लीत अन्नामलाई यांची भाजप अध्यक्ष नितीन नबीन आणि संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत अन्नामलाई यांनी दोन्ही नेत्यांना आपण भाजपमधून बाहेर पडत असल्याचे स्पष्टपणे सांगितले.
अन्नामलाई हे तामिळनाडूत स्वतःचा नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची इच्छा बाळगून असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अद्याप त्यांचा राजीनामा अधिकृतपणे स्वीकारलेला नाही. माजी आयपीएस अधिकाऱ्याची ही नाराजी दूर करण्यासाठी भाजप श्रेष्ठींकडून अजूनही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. वरिष्ठ नेत्यांसोबत पुन्हा एकदा सविस्तर चर्चा झाल्याशिवाय दिल्ली सोडू नये, असा संदेशही त्यांना पक्षाकडून देण्यात आला आहे.
त्रिभाषा धोरणाचा विरोध ठरला मतभेदाचे मुख्य कारण?
अन्नामलाई आणि भाजप केंद्रीय नेतृत्वामध्ये गेल्या काही दिवसांत धोरणात्मक मतभेद टोकाला गेले होते. नुकतेच सीबीएसई (CBSE) द्वारे नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘त्रिभाषा धोरण’ लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती.
तामिळनाडूच्या स्थानिक राजकारणाचा विचार करता, अन्नामलाई यांनी केंद्र सरकारच्या या धोरणाला जाहीर विरोध केला होता, तसेच केंद्र सरकारने ही अधिसूचना तात्काळ मागे घ्यावी अशी मागणीही केली होती. त्यांच्या या जाहीर भूमिकेमुळे पक्षाच्या केंद्रीय धोरणांशी त्यांचे मोठे मतभेद निर्माण झाले आणि यामुळेच त्यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार
भाजपमधील वाढत्या नाराजीच्या आणि नव्या पक्षाच्या स्थापनेच्या चर्चांदरम्यान अन्नामलाई यांनी स्वतः माध्यमांसमोर येत आपली प्रतिक्रिया दिली आहे. चेन्नई विमानतळावरून दिल्लीला रवाना होताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, “मी येत्या दोन दिवसांत माझी पुढील राजकीय भूमिका अधिकृतपणे जाहीर करेन,” असे स्पष्ट केले.
त्यामुळे आता पुढील दोन दिवसांत अन्नामलाई भाजपमध्येच (BJP News) थांबणार की तामिळनाडूच्या राजकारणात स्वतःचा नवा प्रादेशिक पक्ष काढून नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात करणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.






