BJP-NCP: वरिष्ठांचे खडे बोल अन् भाजप- राष्ट्रवादीत मनोमिलन
BJP-NCP:

मतभेदांना पूर्णविराम; बिडकरांचा आम्ही एकचचा संदेश
BJP-NCP: महापालिकेतील निधी वाटपावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेला वाद वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर अखेर निवळण्याच्या मार्गावर आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तैलचित्राच्या निमित्ताने मंगळवारी दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांच्या बैठकीत दोन्ही पक्षांत सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी एकत्र संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन्ही पक्षातील नगरसेवक, तसेच पदाधिकारी शहरातील वाद शहरातच सोडवतील, तसेच एकमेकांच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका, तसेच आरोप करणार नाहीत, असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. महापालिकेच्या मुख्य सभेत आता आपली महापालिकेत युती नाही, असे जाहीरपणे सांगणाऱ्या गणेश बिडकर यांनीच या बैठकीनंतर माध्यमांसमोर आम्ही एकच आहोत, असे सांगत महायुतीतील दोन्ही पक्षांमधील मतभेदांना पूर्णविराम मिळाल्याचे स्पष्ट केले आहे.
या बैठकीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, विरोधी पक्षनेते निलेश निकम, महापौर मंजुषा नागपुरे आणि सभागृह नेते गणेश बिडकर उपस्थित होते.
काय होते वादाचे कारण
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी केली होती. यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये काही काळ राजकीय संघर्ष निर्माण झाला. बालवडकर यांच्या प्रस्तावावर अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करणारे राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास टिंगरे यांच्या प्रभागस्तरीय निधीलाही सत्ताधारी भाजपने कात्री लावली होती. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील नाराजी उघडपणे समोर आली. त्यानंतर सभागृह नेते गणेश बिडकर आणि भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी थेट सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची तक्रार केली होती, तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि माजी आमदार सुनील टिंगरे यांनी महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांना युतीधर्माचा विसर पडल्याची तक्रार केली होती. त्यावरून दोन्ही पक्षांत वाद वाढला होता. भाजपने महापालिकेतील राष्ट्रवादीच्या या दोन्ही नगरसेवकांचा अंदाजपत्रकातील निधी शून्य केला होता.
पुणे शहराची राजकीय संस्कृती आम्ही जपण्याचे काम करीत आहोत. आमच्यात कोणताही वाद नाही. आम्ही केंद्रात, राज्यात आणि महापालिकेतही एकच आहोत. त्यामुळे आमच्यात आता कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही यापुढे शहरासाठी सामंजस्याने काम करणार आहोत.
– गणेश बिडकर, सभागृह नेते
दोन्ही पक्ष स्थानिक पातळीवर पुणेकरांच्या विकासासाठी एकत्र आहोत. यापुढे दोन्ही पक्षात कोणतेही गैरसमज होणार नाहीत, याची खबरदारी घेऊ. पुणेकरांच्या हिताच्या प्रश्नांसाठी आम्ही भाजपसोबत असून, चुकीच्या कामांना मात्र पाठिंबा दिला जाणार नाही.
– सुनील टिंगरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस





