नवी दिल्ली : भाजपचे खासदार भर्तृहरी महताब यांची लोकसभेच्या हंगामी सभापतिपदी नियुक्ती करण्यात आली. नव्या सभापतींची निवड होईपर्यंत ते पीठासीन अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महताब यांची नियुक्ती केल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी दिली. महताब सातव्यांदा खासदार बनले आहेत. ओडिशामधील नेते असणाऱ्या महताब यांनी लोकसभा निवडणुकीआधी बिजदला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणुकीनंतर संसदेचे पहिले अधिवेशन २४ जूनपासून सुरू होईल. अधिवेशनात पहिले दोन दिवस नवनिर्वाचित खासदार लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतील. त्यानंतर २६ जूनला सभापतिपदाची निवडणूक होईल. ते पद भाजप स्वत:कडे ठेवणार की मित्रपक्षाला देणार याविषयी मोठी उत्सुकता आहे.