MLA Shivaji Kardile | अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी कर्डिलेंनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज पहाटे त्रास जाणवू लागल्याने त्यांना अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. नुकतेच शिर्डीजवळील अस्तगाव येथे विखे पाटलांच्या जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित शिव महापुराण कथा सांगता झाली. त्यानंतर शिवाजीराव कर्डिले लोणी येथील विखे पाटलांच्या निवासस्थानी पंडित प्रदीप मिश्रा यांच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी माजी खासदार सुजय विखे पाटील त्यांचा हात धरुन पायऱ्या उतरवताना पाहायला मिळालं होतं. यावेळी भाजप आणि शिवसेनेचे अनेक आमदार उपस्थित होते. MLA Shivaji Kardile | शिवाजीराव कर्डिले यांची राजकीय कारकीर्द शिवाजीराव कर्डिले यांचा सुरूवातीला दुधाचा व्यवसाय होता. कर्डिले ह्यांचा बुऱ्हानगर गावचे सरपंच ते आमदार, माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा अशा पक्षातून त्यांनी कामं केली. शिवाजी कर्डिले हे २००९ मध्ये अपक्ष म्हणून प्रथम निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. २०१४ ला पुन्हा त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले. कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचा पराभव केला होता. दरम्यान, नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते. मात्र कर्डिले यांचे अल्पशा आजारामुळे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह अहिल्यानगर जिल्ह्याला मोठा धक्का बसला. हेही वाचा: Amitabh Bachchan: ‘ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे साप’… गैरवर्तनाच्या घटनेनंतर अमिताभ बच्चन यांचा मोठा जीवनधडा