“अपने धंदे मे एक जायेगा तो सब जायेंगे”; किरीट सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओवर नितेश राणेंची प्रतिक्रिया…

मुंबई – भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यावर आता राजकीय नेते प्रतिक्रिया देत भाजपवर टीका करताना दिसून येत आहे. विरोधकांनी या मुद्यावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. या प्रकरणी आता भाजप नेते नितेश राणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
राणे म्हणाले की, “सत्या चित्रपटातील एक डायलॉग आहे, अपने धंदे में एक जायेगा तो सब जायेंगें. हे फक्त काढणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावं. हमाममध्ये सगळे नंगे असतात. तपासाची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. त्यानुसार तपास झाल्यावर सत्यता बाहेर येईल त्यानंतर त्याविषयी बोलू,” असेही नितेश राणे म्हणाले. दरम्यान, किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
यावेळी नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. “तुम्ही भाजपवर टीका करत असाल तर तुमच्या मालकाच्या मांडीला-मांडी लागून गुन्हेगार बसले आहेत, त्यांना काय दुधाने आंघोळ घातली आहे का? निलेश पराडकर कोण आहे? हा राऊतांच्या बाजूला बसला आहे. याचे माझ्याकडे फोटो आहेत. हा निलेश पराडकर किती मोठा संत आहे याचा तपास केला तेव्हा याच्यावर असलेल्या गुन्ह्याची यादी सापडली. त्याच्यावर ३०२, ३०७, खंडणी, अपहरण असे गुन्हे दाखल आहेत. तुमच्या मांडीला-मांडी लावून बसलेले गुंड त्यांना तुम्ही पदं देऊन ठेवले आहेत. मग तुम्ही कुठल्या तोंडाने दुसऱ्यावर आरोप करता. ठाकरे ड्रायक्लीनींग कंपनीत ह्याला धुवून बाजूला बसवलं आहे का? याबद्दल सामनामध्ये अग्रलेख लिहीण्याची हिंमत संजय राऊत यांनी दाखवावी असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.
सखोल चौकशी केली जाईल – देवेंद्र फडणवीस
तर किरीट सोमय्या प्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी आज सभागृहात चौकशीची मागणी केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले आहे. यावेळी फडणवीस म्हणाले की, “राजकारणात असे अनेक प्रसंग येतात ज्यामुळे माणसाचे सर्व राजकीय आयुष्य पणाला लागते. कोणतेही प्रकरण दाबले जाणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून तपास केला जाईल. हा विषय अतिशय गंभीर आहे. माझ्याकडे तक्रारी द्या मी चौकशी करतो. ती महिला कोण आहे, हे जाहीर करणार नाही. मात्र कुणालाही पाठीशी घालणार नाही.”





