भाजप आमदार गणेश नाईकांनी घेतली अजित पवारांची भेट; घरवापसीच्या चर्चांना उधाण

मुंबई – पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि आता भाजप आमदार असलेले गणेश नाईक यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. नवी मुंबईतील काही भूखंडांच्या समस्यांवरून त्यांनी ही भेट घेतल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात घरवापसीच्या चर्चांना उधाण आलं आहे.
अजित पवार यांच्या भेटीविषयी गणेश नाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, “नवी मुंबई शहरात असे अनेक भूखंड आहेत; जे अजूनही महानगरपालिकेला मिळालेले नाहीत. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मी भेट घेतली. लवकरात लवकर हे भूखंड नवी मुंबई महापालिकेला मिळावेत अशी मागणी मी त्यांच्याकडे केली. कारण हे भूखंड लोकांसाठी आहेत. लोकांसाठी घरांचा विषय महत्वाचा आहे. हे भूखंड नवी मुंबई महापालिकेला मिळणे गरजेचे असून हीच मागणी करण्यासाठी मी अजित पवार यांना भेटायला गेलो,” असं गणेश नाईक यांनी म्हटले.
दरम्यान भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे आणखी १० आमदार राष्ट्रवादीत येणार असल्याचे नमूद केलं होतं. त्या दहांमध्ये गणेश नाईक असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्येच नाईक राष्ट्रवादीत येणार असल्याच्या चर्चा झाल्या होत्या. आता पुन्हा या चर्चांना उधाण आले आहे.





