BJP MLA Resign : मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ‘या’ भाजप आमदाराला सध्याच्या पदाचा द्यावा लागणार राजीनामा

मुंबई : महायुतीला मिळालेल्या बहुमतानंतर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झालं. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबर रोजी पार पडला. यामध्ये एकूण 33 कॅबिनेट तर 6 राज्य मंत्र्यांनी शपथ घेतली. भाजपाचे १९ मंत्री, शिवसेना शिंदे गटाला ११ मंत्री आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला ९ मंत्रीपदे देण्यात आली आहेत. यानंतर आता अजून एक मोठी बातमी समोर आली आहे.
आशिष शेलारांना ‘या’ पदाचा द्यावा लागणार राजीनामा
भाजपचे वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची महायुती सरकारमध्ये मंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे त्यांना बीसीसीआय खजिनदारपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. शेलारांना बीसीसीआयच्या ऑफीस ऑफ प्रॉफीट नियमानुसार हे पद सोडावं लागणार आहे. त्यामुळे आशिष शेलार यांनी राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयच्या खजिनदारपदी कुणाची नियुक्ती होणार? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
आशिष शेलार यांनी राजकारणासह क्रिकेटमध्येदेखील आपली छाप पाडली आहे. एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य ते जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयचे खजीनदार अशी त्यांनी मजल मारली आहे. शेलार जून 2015 साली एमसीए सदस्य म्हणून निवडून गेले. यानंतर जानेवारी 2021 साली एमसीएच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर शेलार यांची 18 ऑक्टोबर 2022 रोजी बीसीसीआय खजिनदारपदी बिनविरोध निवड झाली. मात्र आता त्यांना मंत्रीपदामुळे या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.





