ठाणे : एकनाथ शिंदे यांच्या ठाणे या बालेकिल्ल्यात अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवत सत्ता हस्तगत केली आहे. बदलापूर आणि अंबरनाथ नगरपरिषदेतील शिवसेनेचा पराभव हा खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे. या दोन्ही नगरपरिषदा श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात येतात. गेल्या 25 वर्षांपासून अंबरनाथ हा शिवसेनेचा हा बालेकिल्ला होता. मात्र, या बालेकिल्ल्यात भाजपच्या तेजश्री करंजुळे यांनी सुरुंग लावला आहे. मतदानाच्या अवघ्या 48 तास आधी अंबरनाथमध्ये झालेल्या गोळीबाराचा थेट परिणाम नगराध्यक्षपदाच्या मतांवर झाला आहे. अंबरनाथमध्ये वाळेकर कुटुंबीयांची असलेली दहशत हा मुद्दा उपस्थित करत विरोधक भाजपने निवडणूक प्रचार केला होता. भाजप-शिवसेना युतीतील वादामुळे अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या विरोधात भाजप हा पर्याय मतदारांना उपलब्ध झाला. शिवसेनेचे अंबरनाथ शहरप्रमुख व माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर तसेच त्यांचे पुत्र निखिल वाळेकर यांचा अति आत्मविश्वास शिवसेनेसाठी अडचणीचा ठरला. अंबरनाथमधील व्यापारी संघाने शेवटच्या टप्प्यात भाजपला पाठिंबा दिला. प्रचारासाठी मिळालेला वाढीव वेळ शिवसेनेने चांगल्या प्रकारे वापरला. मात्र त्याचा फायदा मुख्यतः नगरसेवक पदापुरताच मर्यादित राहिला. प्रचारासाठी मिळालेल्या वाढीव वेळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य वेळी अंबरनाथमध्ये सभा घेतल्याने भाजपला नगराध्यक्षपदासाठी थेट फायदा झाला.