- प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांचा इशारा
- जिल्हाधिकारी, तहसीलदारांना देणार निवेदन
पिंपरी – गेली अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर महिलेने केलेल्या आरोपानंतर जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणे गरजेचे होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, तहसीलदारांना देखील निवेदन देणार असल्याचे उमा खापरे यांनी सांगितले.
मंत्री मुंडे यांच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. रेणू शर्मा नावाच्या तरुणीने ब्लॅकमेल करून अनैसर्गिक कृत्य व अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली आहे. मंत्री मुंडे यांनीही सोशल मिडीयावर कबुली दिली आहे. त्यानुसार मंत्री मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र त्यांनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे येत्या सोमवारपासून भाजपा महिला मोर्चाकडून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे.
तसेच रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करून मुंडे यांना मंत्री पदावर का ठेवले आहे? याबाबत जाब विचारणार असल्याचा इशारा खापरे यांनी दिला.