प्रभात वृत्तसेवा पुणे – शनिवारचा दिवस भाजप निष्ठावंतांसाठी निराशेचा ठरला. आपल्यालाच तिकीट मिळेल, अशी ठाम खात्री बाळगून अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. जय्यत तयारीही केली. मात्र, अर्ज दाखल करायच्या तीनच दिवस आधी अन्य पक्षांतून आयारामांना आणल्याने त्यांनी निराश होऊन संपर्क कार्यालये बंद केली. याशिवाय मतदारांना वाटण्यासाठी बनवलेल्या गोष्टी चक्क फेकून दिल्या. वारजेमध्ये हा प्रकार घडला. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील काही माजी नगरसेवकांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून थेट भाजपमध्ये प्रवेश केला. वास्तविक दोन्ही राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांमध्ये ‘साहेबां’बरोबर रहायचे, की ‘दादा’बरोबर हा प्रश्न होता. दादांनी भाजपशी हातमिळवणी केल्यामुळे तेथे आपले काहीतरी कल्याण होईल. असे वाटून दादांना बऱ्याच जणांनी साथ दिली; परंतु खडकवासला मतदारसंघात ‘साहेबां’ची साथ राष्ट्रवादीच्या कट्टर कार्यकर्त्यांनी सोडून थेट कमळच हाती घेतले. त्यामुळे तेथील निष्ठावान अस्वस्थ झाले आहेत.खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा तीन टर्म भाजपने राखला आहे. तेथील सचिन दोडके यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदारकीही लढवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ते कट्टर कार्यकर्ते होते. बारामती लोकसभा मतदारसंघात हा मतदार संघ येतो. त्या वेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांना साहजिकच जास्त मते पडण्यासाठी त्यांनी काम केले होते. राष्ट्रवादीचे दोन पक्ष झाल्याने आता थेट ज्यांनी खिंडार पाडले, त्याच पक्षात जाण्याचा विचार करून या माजी नगरसेवकांनी थेट भाजपत प्रवेश केला आहे.महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर एक-दोन दशके खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या ज्या भाजप कार्यकर्त्यांनी तिकिटाचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या मनसुब्यांवर पाणीच फिरले आहे. पक्षाने आयारामांना तिकीटाचे स्वप्न दाखवले असणार, हे गृहित धरून या कार्यकर्त्यांची निराशा झाली. काही दिवसांपूर्वी थाटलेली संपर्क कार्यालये त्यांनी तातडीने बंद केली. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपर्यंतच्या नेत्यांचे फोटो असलेली नवीन वर्षाची दिनदर्शिका एका कार्यकर्त्याने मतदारांना वाटण्यासाठी छापली होती.तीही त्याने चक्क कचऱ्यात टाकून दिली. नाराजी आणखी उफाळणार? आणखीही पक्षप्रवेश होतील. अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांनी, इच्छुकांनी भाजपचे अर्ज नेऊन ते भरले आहेत. मात्र, त्यांची नावे गुलदस्त्यात आहेत. तिकीट वाटपावेळी जेव्हा ती उघडतील, त्या वेळी ही नाराजी आणखी उफाळून येण्याची शक्यता आहे. आता हे निष्ठावान आयारामांचा प्रचार करणार की गायब होणार, हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.