मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, राज्यात २ डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर मतमोजणी ३ डिसेंबरला होईल. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, सर्वच पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. स्टार प्रचारकांची यादी – भाजपाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या असून, प्रचारात कोणतीही कसर न सोडण्याचा निर्धार केला आहे. जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिव प्रकाश जी, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे ,अशोक चव्हाण, पियूष गोयल, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत (दादा) पाटील, रावसाहेब दानवे पाटील,ॲड. आशिष शेलार ,राधाकृष्ण विखे पाटील, मुरलीधर मोहोळ, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गणेश नाईक, जयकुमार रावल,छ. शिवेंद्र राजे भोसले, नितेश राणे ,जयकुमार गोरे, मेघना बोर्डिकर, अमर साबळे, अतुल सावे, अशोक उईके, चित्रा वाघ, रक्षा खडसे, प्रविण दरेकर,डॉ. भागवत कराड, गोपीचंद पडळकर, डॉ. संजय कूटे, अमित साटम, धनंजय महाडिक, ॲड. माधवी नाईक, काशिनाथ सावरकर, अशोक मेथे, मंगेश चव्हाण, प्रसाद लाड, इद्रीस मुलानी यांचा समावेश आहे. काही ठिकाणी महायुतीत तर, काही ठिकाणी स्वबळावर लढत – समोर आलेल्या माहितीनुसार, भाजपा राज्यात काही ठिकाणी ही निवडणूक महायुतीमधील घटक पक्षांसोबत लढणार आहे, तर काही ठिकाणी पक्षाकडून स्वबळावर निवडणूक लढवली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने, मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. निवडणुकांपूर्वी ‘पक्षांतरा’ला वेग; घटक पक्षांमध्ये नाराजी – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतरालाही मोठा वेग आला आहे. महायुतीमधीलच शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) मधील अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. या वाढत्या पक्षांतरामुळे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि खासदार नरेश मस्के यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. मात्र, या नाराजीनंतरही भाजपामध्ये होणारे पक्षप्रवेश अद्याप सुरूच आहेत. ही निवडणूक केवळ स्थानिक सत्ताकारणासाठीच नाही, तर यानंतर लगेच होणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी देखील राजकीय दिशा ठरवणारी ठरणार आहे.