कोलकाता – तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि कीर्ती आझाद यांच्यातील शाब्दिक वादाचा व्हिडिओ भाजपच्या अमित मालवीय यांनी शेयर केल्याने बंगालच्या सत्ताधारी पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख असलेल्या मालवीय यांनी तृणमुलच्या दोन्ही नेत्यांमधील वादाचे स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ पोस्ट करून बंगालच्या तृणमुलमध्ये वादाची ठिणगी टाकण्याचे काम केले आहे. तृणमुल काँग्रेसचे एक शिष्टमंडळ ४ एप्रिलला खोट्या मतदार ओळखपत्रांबाबत निवेदन सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाला भेट दिली होती. त्यावेळी या वादाला सुरूवात झाली होती. तृणमुलच्या खासदार महुआ मोइत्रा यांचे नाव लोकसभेतील पक्षाचे मुख्य प्रतोद कल्याण बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या निवेदनातून वगळले होते. त्यावरून मोइत्रा संतापल्या होत्या. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या आवारात दोन्ही खासदारांमध्ये बाचाबाची झाली. या वादानंतर कल्याण बॅनर्जी यांनी मोइत्रा यांनी तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता, असा दावा केला आहे. त्यानंतर हा वाद तृणमूल खासदारांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोहोचल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली, जिथे बॅनर्जी आणि तृणमूल खासदार कीर्ती आझाद यांच्यात खडाजंगी झाली. या ग्रुपमधील संभाषणांचे चॅट मालवीय यांनी व्हायरल केले. बॅनर्जी यांनी किर्ती आझाद यांच्यावर ‘अंतर्गत राजकारणाचे कर्णधार’ अशी टिपणी करताना क्रिकेट प्रशासनातील त्यांच्या निवडणुकीतील पराभवाबद्दल त्यांची खिल्ली उडवली. त्यानंतर आझाद यांनी देखील जशाच तसे उत्तर देताना तोंडी व लेखी तक्रार केली होती. तृणमुलच्या दोन्ही खासदारांनी राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना त्यांच्या तक्रारींची सविस्तर पत्रे पाठवली आहेत. त्यामुळे हे प्रकरण ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत गेले असल्याने त्या काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.