छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. गंगापूर तालुक्यातील एका पुलाजवळ कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. भाजप नेत्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातील भालगाव येथील रहिवासी असलेले भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर यांचा मृतदेह आढळून आला. गंगापूर तालुक्यातील नारावाडी शिवारात रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हदियाबाद-नारवाडी मार्गावर नारवाडी शिवारात नळकांडी पुलाजवळ गणेश टेमकर यांचा मृतदेह आढळला. त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला हे स्पष्ट होऊ शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.