Maharashtra Election : पक्षाने विधानसभा लढवायला सांगितली; मात्र मी नकार दिला; विनोद तावडेंचा मोठा खुलासा

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते विनोद तावडे यांनी विधानसभा निवडणुकीबाबत एक मोठा खुलासा केला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने आपल्याला निवडणूक लढण्यास सांगितलं होतं पण मी नकार दिला असा खुलासा त्यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात रस नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले विनोद तावडे?
राज्याच्या राजकारणात येणार का असं विचारलं असता विनोद तावडे यांनी म्हटलं की, मला राज्याच्या राजकारणात रस नाही. केंद्रात संघटनेसाठी मी काम करत आहे त्यामुळे आता पुन्हा महाराष्ट्रात फारसा रस नाही. माझ्यासाठी फक्त राष्ट्राला प्राधान्य आहे. माझं तिकीट २०१८ मध्ये कापण्यात आलं होतं पण मी आज संघटनेत काम करतोय. मला पक्षाने विधानसभा लढण्यास सांगितलं होतं पण मी नकार दिला.
मुख्यमंत्रीपदाबद्दल काय म्हणाले?
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आणि पक्षाच्या अध्यक्षपदावर विनोत तावडे म्हणाले की, भाजपमध्ये ज्या नावाची चर्चा होते त्यांना बनवलं जात नाही. मला पक्षाचं काम करण्यात जास्त रस आहे. निवडणुकीनंतर पुढचा मुख्यमंत्री कोण होईल हे ठरवलं जाईल असे विनोद तावडे म्हणाले.





