कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांच्या ताफ्यावर कूचबिहार जिल्ह्यात निदर्शनादरम्यान तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील खागराबारी भागात तणाव निर्माण झाला आहे. हल्ल्यात अधिकारी आणि माजी केंद्रीय मंत्री निशीथ प्रामाणिक ज्या गाडीत प्रवास करत होते त्या गाडीची बुलेटप्रूफ काच फुटली. पोलिसांच्या गाडीच्याही काचा फुटल्या. तथापि, तृणमूल काँग्रेसने या आरोपांना सुव्यवस्थित नाटक म्हटले आहे. सुवेंदु अधिकारी हे कूचबिहारमधील पोलिस अधीक्षक (एसपी) कार्यालयाबाहेर भारतीय जनता पक्षाच्या रॅली आणि निदर्शनाचे नेतृत्व करण्यासाठी आणि एसपींना निवेदन देण्यासाठी उत्तर बंगाल जिल्ह्यात आले होते. या प्रकरणी माजी गृहराज्यमंत्री निशीथ प्रामाणिक म्हणाले, आम्हाला अशी घटना घडणार असल्याची माहिती मिळाली होती. म्हणूनच मी सुवेंदुअधिकारी यांना बुलेटप्रूफ गाडीत बसण्यास सांगितले. आम्ही कूचबिहारमध्ये प्रवेश करताच, तृणमूल काँग्रेसचे झेंडे घेऊन लोकांनी आमच्यावर हल्ला केला. गर्दी वाढतच गेली, आम्ही पोलिसांना याची माहिती दिली, पण कोणतीही कारवाई झाली नाही. जेव्हा आम्ही खागराबारी येथे पोहोचलो तेव्हा बरेच लोक मशिदीतून बाहेर पडले, त्यांनी ताफ्याला घेरले आणि धार्मिक घोषणाबाजी केली. जिहादींनी गाडीवर अशा प्रकारे हल्ला केला की बुलेटप्रूफ खिडकीची काच फुटली. हा निषेध नव्हता, हा एक खूनी हल्ला होता.