वलसाड – गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील वापी तालुक्याचे भाजप उपाध्यक्ष शैलेश पटेल यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली आहे. ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश पटेल पत्नीसोबत दर सोमवारी शिवमंदिरात दर्शनासाठी जातात. आजही ते सकाळी 7.30च्या सुमारास पत्नीसह मंदिरात पोहोचले होते. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर शैलेश पटेल पत्नीची वाट पाहत गाडीत बसले होते. याचवेळी एक दुचाकी अचानक त्यांच्या गाडीजवळ येऊन थांबली.
या दुचाकीवरून आलेल्या चौघांनी शैलेश पटेल यांना काही समजायच्या आधीच त्यांच्यावर गोळीबार केला. पटेल यांच्यावर फायर केलेल्या चार गोळ्यांपैकी तीन गोळ्या त्यांना लागल्या. या घटनेनंतर सर्व हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणी पोलिसांना गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.