भाजपला धक्का! बड्या नेत्याचा अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत काॅंग्रेसमध्ये प्रवेश

नांदेड – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर आता नागनाथ घिसेवाड यांनी पक्षाला रामराम केला आहे. बहुजनांचे नेते अशी ओळख असलेल्या घिसेवाड यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
हा पक्षप्रवेश भाजपसाठी मोठा धक्का मानला जात असून याचा कॉंग्रेसला फायदा होणार आहे.
भोकर तालुक्यात मोठा जनाधार आणि कार्यकर्त्यांची फौज घिसेवाड यांच्या पाठीशी आहे. आगामी काळात भोकर नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे.
घिसेवाड यांच्या पक्षांतरामुळे भोकरमध्ये कॉंग्रेसला स्पर्धकच शिल्लक राहिलेला नाही. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आपण भोकरमध्ये पक्ष वाढीचे काम करणार असल्याचे नागनाथ घिसेवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, नागनाथ घिसेवाड हे नांदेड जिल्ह्यातील लोकप्रिय बहुजन नेतृत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. तब्बल दोन वेळा त्यांनी भोकर विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती, दोन्हीही वेळा अत्यल्प मताने त्यांचा पराभव झाला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवत गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये काम करायला सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र स्थानिक पातळीवर असणाऱ्या गटातटाच्या राजकारणाला कंटाळून ते आता कॉंग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.





